ठाणे | उत्तम प्रशासक

स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई अव्वल! इंदूरची आठ वर्षांची मक्तेदारी मोडीत

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयामार्फत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ (Swachh Survekshan 2025-26)च्या स्पर्धेत महाराष्ट्रातील शहरांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवत देदीप्यमान यश संपादन केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने प्रतिष्ठेच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ श्रेणीत संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावून राज्याची मान उंचावली आहे. नवी मुंबईने स्वच्छ भारत अभियानात मध्य प्रदेशातील इंदूर शहराची सलग आठ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढत या स्पर्धेत देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात देशभरातील ४,७५१ हून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यातील विविध शहरांचा गौरव करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने प्रभावी कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचऱ्याचे अचूक वर्गीकरण, कचऱ्यावरील शास्त्रोक्त प्रक्रिया, स्वच्छ सार्वजनिक परिसर आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या जोरावर गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा या शहरांना मागे टाकत हा सर्वोच्च पुरस्कार मिळवला आहे. मोठ्या शहरांसोबतच महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम शहरांनीही आपल्या स्वच्छतेच्या कामगिरीने देशाचे लक्ष वेधून घेतले. सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने २० ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान पटकावले, तर पर्यटननगरी पाचगणीने २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या लहान शहरांच्या गटात दुसरा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय, कोकणातील रत्नागिरी नगरपरिषदेने किनारपट्टीची स्वच्छता, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर ‘स्वच्छ तटीय (किनारा) शहर’ या श्रेणीत देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नियमित कचरा संकलन, सार्वजनिक परिसराचे सुशोभीकरण आणि नागरिकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून ‘स्टेट फर्स्ट स्वच्छ सिटी’ अर्थात राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला आहे.

२०१४ मध्ये देशात शहरी कचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रियेचे प्रमाण केवळ सोळा टक्के होते, जे आता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, तसेच ९६ टक्क्यांहून अधिक घरांमधून घरपोच कचरा गोळा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही स्वच्छता हा केवळ सौंदर्याचा विषय नसून तो नागरिकांचे आरोग्य आणि सामूहिक जबाबदारीशी निगडित असल्याचे सांगत ‘बढाएं हाथ, करें सफाई साथ’ या संकल्पनेतून ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील याच समन्वयाचे मूर्त रूप महाराष्ट्रातील या विजेत्या शहरांच्या कामगिरीतून दिसून आले असून, स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्याने देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *