मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळींचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा नुकताच पार पडला. मुंबई पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या तीन पुनर्वसन इमारतींमधील ५५७ पात्र कुटुंबांना हक्काचे व प्रशस्त अशा ५०० चौरस फुटांच्या घरांच्या चावीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्यावतीने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. मागील वर्षी वरळी बीडीडी चाळीतील ५५६ रहिवाशांना नवीन घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात अकरा रहिवाशांना फ्लॅटची चावी आणि ताबा पत्रांचे वितरण करण्यात आले. ऐतिहासिक अशा बीडीडी चाळींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. पण २०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले आणि या रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळाली. अनेक खासगी विकासकांनी यासाठी विशेष रस दाखवला होता. पण फक्त नफा कमावणाऱ्या खाजगी विकासकांवर हा एवढा मोठा प्रकल्प सोपविण्यास देवेंद्र फडणवीस यांनी नकार देत. याची जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातील संभाव्य अडचणी लक्षात घेत त्यांनी म्हाडाला विकासक म्हणून नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. २०१७-१८ पासून सुरू झालेल्या या कामात अनेक अडथळे आले. पण राज्य सरकारने या प्रकल्पात खंड पडू न देता काम निरंतर सुरू ठेवले. ज्यामुळे आशियातील नागरी पुनरुत्थानाचा हा सर्वांत मोठा प्रकल्प आज प्रत्यक्ष साकार झाला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते कामगार चळवळीपर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडी अनुभवणाऱ्या बीडीडी चाळींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक यांच्या वास्तव्याचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे. या वारसा लक्षात घेऊन मूळ मुंबईकर आणि पिढ्यानपिढ्या शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शहराबाहेर विस्थापित न करता, आहे त्याच ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त मोठी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकार चाळवासियांना फक्त घरे देण्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर मुंबईची अस्सल संस्कृती आणि नाडी जपणाऱ्या रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईची संस्कृती घडवणाऱ्या या भूमिपुत्रांना त्यांच्याच हक्काच्या जागेवर प्रशस्त आणि सुरक्षित घरे बांधून दिली. महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मुंबईबाहेर हद्दपार होऊ देणार नाही, या विश्वासाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
