कृषिगाथा | महाराष्ट्र सेवक | मानवगाथा

देवेंद्र फडणवीस ऐन दिवाळीत बांधावर; शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी!

दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे जेव्हा बळीराजाच्या डोळ्यांत दुष्काळाची चिंता दाटून येते, तेव्हा राज्याच्या प्रमुखाने केवळ सरकारी घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष त्याच्या दारात उभे राहणे, ही खरी लोकसंवेदनशीलता ठरते. महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी संकटाने घेरलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवण्यासाठी यंदाची दिवाळी त्यांच्या सोबतीने साजरी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या संवेदनशील, तळमळीच्या आणि लोककल्याणकारी नेतृत्वाची साक्ष देतो. वातानुकूलित दालनांमधून फाईल्स हाताळण्यापेक्षा थेट मातीत उतरून, शेतकऱ्याच्या झोपडीत जाऊन त्याचे दुःख वाटून घेण्याची त्यांची वृत्ती त्यांच्यातील मानवतावादी दृष्टिकोनाचे दर्शन घडवते.

देवाभाऊ शेतकऱ्यांच्या सुख-दु:खात सहभागी!

नागपूर दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीत थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. या वेळी महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजनांचा आढावा घेत, सरकारच्या दुष्काळग्रस्त शेतकरी मदत योजने अंतर्गत त्यांना दिलासा देणारी विशेष दिवाळी भेट यापूर्वीच जाहीर करून त्याचे वाटप देखील सुरू केले. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी थांबून, त्यांच्यासोबत राहून बालपांडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी सुख-दुःखाच्या गोष्टी करत मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील अंतराची भिंत एका क्षणात मोडून काढली. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा संकटात सापडलेल्या आपल्याच कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी होता. त्यांनी दिवाळी सणाबरोबरच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसाअभावी करपलेली कपाशी आणि तुरीच्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात उमटलेल्या वेदना दिसत होत्या. यावर त्यांनी राज्यातील कोणताही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास दिला.

मानवतावादी दृष्टीकोनाबरोबरच प्रशासकीय दूरदृष्टीची भक्कम जोड

शेतकऱ्याचे दु:ख समजून घेत, त्याला मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मानवतावादी व्यक्तिमत्त्वाला प्रशासकीय दूरदृष्टीची भक्कम जोड असल्याचेही दाखवून दिले. शेतकऱ्याला तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा कायमस्वरूपी सक्षम करण्याची गरज ओळखून त्यांनी ४३ वर्षे प्रलंबित असलेल्या पाझर तलावाचा प्रश्न निकाली काढला. खोरी प्रकल्पाला गती दिली आणि जलसंधारणाच्या कामांना गती देत जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरणांच्या माध्यमातून जमिनीची तहान भागवण्याचा निर्धार केला. संकटाच्या काळात झाडे जगवण्यासाठी विहिरींवरील बंदी शिथिल करण्याचा घेतलेला व्यावहारिक निर्णय असो वा वन्यप्राण्यांपासून शेती वाचवण्यासाठी सौर कुंपणाची योजना असो, शेतकऱ्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या अडचणीवर त्यांनी तत्परतेने उपाय योजले आहेत. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यातील कारुण्याचा प्रत्ययही आला. एका अपघातात पाय गमावलेल्या होतकरू विद्यार्थ्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला. तसेच महिला सरपंचाच्या तक्रारींवर क्षणाचाही विलंब न लावता कडक कारवाईचे आदेश दिले.

सामान्य माणसाच्या वेदनेशी एकरूप होऊन त्यांना धीर देण्याची वृत्ती ही त्यांच्यातील महाराष्ट्र सेवकातून सतत डोकावत असते. प्रशासक म्हणून दुष्काळाच्या अंधाराशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला ‘मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’ हा विश्वास प्रत्यक्ष कृतीतून देत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर साजरी केलेली ही दिवाळी लोककल्याण आणि संवेदनशीलता अधोरेखित करणारी आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *