तिसरी मुंबई | इन्फ्रा मॅन

तिसरी मुंबई (मुंबई 3.0): सिंगापूरसोबत करार, जागतिक दर्जाच्या नागरी विकासाची नांदी

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) हा भारताच्या आर्थिक नकाशावरील सर्वात महत्त्वाचा प्रदेश मानला जातो. या प्रदेशाच्या विस्ताराचा पुढील टप्पा म्हणजे तिसरी मुंबई (मुंबई ३.०). अटल सेतूच्या पायथ्याशी, रायगड जिल्ह्याच्या परिसरात आकारास येणारा तिसरी मुंबई हा एक नियोजित, आधुनिक आणि जागतिक दर्जाचा नागरी विकास प्रकल्प आहे. तिसऱ्या मुंबईतील स्मार्ट सिटीच्या मास्टर प्लॅनसाठी सिंगापूरची मदत घेतली जाणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने सिंगापूरमधील नामांकित सुरबाना ज्युराँग आणि मॅपलट्री या कंपन्यांसोबत महत्त्वपूर्ण करार केले आहेत. या करारामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला ठोस दिशा मिळणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि एमएमआरमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रायगड परिसराच्या विकासाला आधीच मोठी चालना मिळत आहे. या पायाभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि तिसरी मुंबई (मुंबई ३.०) या दोन प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली होती. त्यानुसार ही क्षमता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र सरकारची सिंगापूरसोबत सामरिक भागीदारी

सिंगापूरमधील या कंपनीला शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाची शहरे विकसित करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. याच अनुभवाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सिंगापूरमधील संस्थांशी करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून ३० आठवड्यात तिसऱ्या मुंबईचा आराखडा तयार केला जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे देश-विदेशातील गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), आरपीजीसीएल (रायगड – पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड) सारख्या संस्था मदत करत आहेत. एमएमआरडीएची ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. सिंगापूरची ही कंपनी दोन टप्प्यात तिसऱ्या मुंबईचा आराखडा तयार करणार आहे. या कामासाठी सदर कंपनीला पहिल्या टप्प्यासाठी ११.८९ कोटी तर दुसऱ्या टप्प्यासाठी २३.१२ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तिसऱ्या मुंबईच्या दिशेने राज्य सरकारने पुढीलप्रमाणे ३ प्रमुख करारांवर भर दिला आहे.

तिसरी मुंबई स्मार्ट सिटी

मॅपलट्री कंपनीद्वारे १०० एकर जागेचा एकात्मिक विकास

रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड (आरपीजीसीएल) आणि मॅपलट्री रिअल इस्टेट ॲडव्हायझर्स पीटीई लिमिटेड यांच्यात १०० एकर क्षेत्रावरील एकात्मिक, मिश्र-वापर विकास प्रकल्पासाठी नॉन-बाईंडिंग टर्म शीट/लेटर ऑफ इंटेंट (LoI) यांची देवाणघेवाण झाली. या प्रकल्पात मॅपलट्री कडून भांडवली व कार्यकारी गुंतवणूक, मूल्यनिर्मिती आणि जागतिक कंपन्या व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम केले जाणार आहे.

सुरबाना ज्युराँग – प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार

रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेडने सिंगापूर सरकारच्या सुरबाना ज्युराँग या संस्थेची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेने याआधीच रायगड-पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. आता अंमलबजावणीच्या टप्प्यात संस्था कंत्राटदाराच्या कामांचे परीक्षण व मंजुरी, डिझाईन, अभियांत्रिकी आराखडे व कागदपत्रांचे परीक्षण, बांधकामाच्या गुणवत्तेचे व प्रगतीचे निरीक्षण, करारातील अटींचे पालन तपासणे, कामाच्या टप्प्यांचे प्रमाणन आणि आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांची शिफारस आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.

मुंबई ३.० – केएससी न्यू टाऊनसाठी मास्टर प्लॅन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि सुरबाना ज्युराँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, सिंगापूर यांच्यात केएससी न्यू टाऊनसाठी मास्टर प्लॅन, व्हिजन डॉक्युमेंट आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी सल्लागार सेवा देण्याबाबत करार करण्यात आला आहे.

मुंबई ३.०: सहभागातून सर्वांगीण विकास

मुंबई ३.० च्या मास्टर प्लॅनमध्ये जमिनीचा वापर, वाहतूक व दळणवळण व्यवस्था, गृहनिर्माण, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रे, सामाजिक पायाभूत सुविधा आणि अन्य नागरी सुविधा यांचे एकात्मिक नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२६ मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सुरबाना ज्युराँग आणि एमएमआरडीए यांच्यात मुंबई ३.० च्या मास्टर प्लॅनसाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानंतर, रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि सुरबाना ज्युराँग यांच्यात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा करार झाला. दरम्यान, अलीकडेच रायगड पेण ग्रोथ सेंटर (ऑरेंज स्मार्ट सिटी) आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकर प्रकल्पाच्या विकासासाठी करार झाला. त्यानंतर आता तिसऱ्या मुंबईच्या आराखड्याला मूर्त रूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांमधील सुमारे ३२३.४४ चौ. किमी क्षेत्र अधिग्रहित करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचना जाहीर केली. त्यानंतर १६ मार्च २०२६ रोजी राज्य सरकारने ‘भूसंपादन व भूवाटप धोरण’ लागू करण्यास मान्यता दिली.

भविष्यातील दिशा: तिसरी व चौथी मुंबई

मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्तारासोबत भविष्यात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई या नव्या विकासकेंद्रांचा उदय होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि एमएमआरमधील प्रस्तावित विकास केंद्रांची एकात्मिक सांगड घालून भविष्यातील आर्थिक विकासासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यातून रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) या मॉडेलमुळे भांडवली गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे नियोजन आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभव यांचा लाभ महाराष्ट्राला मिळणार आहे. तिसरी मुंबई ही फक्त एक नागरी विस्तार योजना नाही. तर महाराष्ट्राच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने टाकलेले एक धोरणात्मक पाऊल आहे. सिंगापूरमधील अनुभवी कंपन्यांच्या मदतीने नियोजन, गुंतवणूक आणि अंमलबजावणी या तिन्ही पातळ्यांवर या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *