इन्फ्रा मॅन | महामुंबई इन्फ्रा | मेट्रो मॅन

मेट्रो, रेल्वे अन् बसला एका टॅपवर आणणाऱ्या ‘मुंबई वन’ने पार केला १० महिन्यांत १ कोटी तिकिटांचा टप्पा!

मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘मुंबई वन’ कार्ड आणि ॲपने अल्पावधीतच १ कोटी ४ लाख ११ हजार ८२४ तिकिटांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई मेट्रोच्या विविध टप्प्यांसह बेस्ट आणि उपनगरीय परिसरातील बस सेवा, मुंबई लोकल रेल्वे आणि मोनोरेल अशा विविध वाहतूक पर्यायांना एकाच डिजिटल मंचावर जोडण्याचे काम या प्रणालीने यशस्वीपणे केले आहे. मुंबई वन ॲपवर मुंबई लोकल तिकीट, मेट्रो तिकिट बुकिंग, बस तिकिट बुकिंग अशा सर्व ट्रान्सपोर्टचे तिकिट एकाच ॲपवर करता येत आहे.

दैनंदिन प्रवासात तिकीट खिडकीवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमधून मुक्ती मिळणे, सुट्ट्या पैशांची कटकट संपणे आणि वेळेची मोठी बचत होणे या घटकांमुळे मुंबईकरांना मुंबई वन कार्ड प्रणाली आवडू लागल्याचे दिसून येते. ही प्रणाली फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) तंत्रज्ञानावर आधारित असल्याने प्रवाशांना देशभरातील इतर प्रमुख शहरांमधील एनसीएमसी समर्थित मेट्रो आणि बस सेवांमध्येही याचा सहज वापर करता येतो. यूपीआय, नेट बँकिंग आणि कार्डच्या माध्यमातून डिजिटल वॉलेट सहज रीचार्ज करण्याची सोय तसेच अतिरिक्त प्रक्रिया शुल्क न आकारले जाणे यासारख्या सुविधांमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा एक अत्यंत विश्वासू आणि सोयीस्कर पर्याय बनला आहे. रोजच्या प्रवासातील अडथळे दूर करत मुंबई वन कार्डने १ कोटी प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. आगामी काळात मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा अधिक आधुनिक आणि डिजिटल बनवण्यात हे कार्ड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

मुंबई वन द्वारे मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) एकूण ११ प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकाच डिजिटल मंचावरून/ॲपवरून बुकिंग आणि तिकीट सेवा उपलब्ध आहे. या ॲपवर मुंबईतील जवळपास सर्व प्रकारच्या वाहतूक सेवांची लाभ घेता येत आहे.

मुंबई लोकल रेल्वे

मुंबई उपनगरीय रेल्वे: मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील सर्व लोकल ट्रेन प्रवासासाठी तिकीट व मॅप-बेस्ड बुकिंग करता येते..

मेट्रो आणि मोनोरेल सेवा

मुंबई मेट्रो लाईन १: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर
मुंबई मेट्रो लाईन २A आणि ७: दहिसर ते डी. एन. नगर आणि दहिसर पूर्व ते गुंदवली
मुंबई मेट्रो लाईन ३ (ॲक्वा लाईन): आरे ते कुलाबा भूमिगत मार्ग
नवी मुंबई मेट्रो: बेलापूर ते पेंधर (Line 1)
मुंबई मोनोरेल: गाडगे महाराज चौक ते चेंबूर मार्ग

सार्वजनिक बस सेवा

मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील एकूण ५ महानगरपालिका/वाहतूक उपक्रमांच्या बस सेवा या ॲपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यात मुंबई शहर व उपनगरातील बेस्ट सेवा, ठाणे महापालिका परिवहन मंडळाची टीएमटी, नवी मुंबई महापालिका परिवहनची एनएमएमटी, कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन मंडळाची केडीएमटी आणि मीरा-भाईंदर महापालिकेची एमबीएमटी यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई वन प्रणालीचे लोकार्पण झाले होते. हे अ‍ॅप आतापर्यंत ८ लाख १६ हजार ४०२ वेळा डाउनलोड्स झाले आहे, त्यापैकी ७४ टक्के Android तर २६ टक्के iOS वापरकर्ते आहेत. मुंबई वन ने १.०४ कोटी तिकिटांचा टप्पा गाठत मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीच्या डिजिटल एकत्रीकरणाला नवा वेग दिला आहे. मुंबई वन ॲपमधील मल्टीमोडल जर्नी प्लॅनरमुळे प्रवाशांना एकाच प्रवासात मेट्रो, लोकल आणि बस असा एकत्र बदलून प्रवास करायचा असल्यास एकाच डिजिटल क्यूआर कोड द्वारे संपूर्ण प्रवासाचे तिकीट बुक करता येते.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *