उत्तम प्रशासक

नवी मुंबई एज्युसिटी – राज्याचे नाही तर देशाचे आंतरराष्ट्रीय ‘शैक्षणिक हब’ बनणार!

भारताला जागतिक शिक्षणक्षेत्रात अग्रस्थानी नेण्याच्या जिद्दीने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्रात, विशेषतः नवी मुंबईत एका ऐतिहासिक शैक्षणिक क्रांतीचा पाया रचला गेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीतून परदेशी विद्यापीठे आता थेट भारतात येत आहेत. महाराष्ट्राने या प्रक्रियेत आघाडी घेतली आहे. नवी मुंबईत सिडकोच्या मदतीने आकाराला येत असलेले ‘नवी मुंबई एज्युसिटी’ हे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक हब केवळ राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक अभिमानास्पद पाऊल ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्याच शहरात मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सामंजस्य कराराद्वारे स्कॉटलंडचे युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन, ब्रिटनचे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, ऑस्ट्रेलियाचे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, अमेरिकेचे इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इटलीचे इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन हे पाच नामांकित जागतिक शैक्षणिक संस्थांचे समूह नवी मुंबईत आपले संकुल स्थापन करत आहेत. ही घटना केवळ शैक्षणिक विस्तार नसून, मुंबई आणि नवी मुंबईला जागतिक शैक्षणिक नकाशावर एक नवी ओळख मिळवून देणारी आहे.

नवी मुंबई एज्युसिटी

अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठाची एज्युसिटी निर्मितीसाठी मदत

नवी मुंबईतील या प्रस्तावित एज्युसिटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिकटचे गव्हर्नर नेड लॅमांट आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत १ मार्च २०२५ रोजी मुंबईत भेट घेतली होती. या एज्युसिटीच्या निर्माणासाठी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्य मदत करणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित एज्युसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणार असल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने मेट्रो, नवीन विमानतळ, आंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यात येत आहे.

परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, परंतु त्यासोबत येणारा प्रचंड आर्थिक भार पालकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. आता ही परिस्थिती बदलणार असून, जागतिक दर्जाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशातच, अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणार आहेत. या विद्यापीठांच्या माध्यमातून स्टेम, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फॅशन डिझाईन आणि प्रगत अभियांत्रिकी यांसारख्या आधुनिक विषयांचे शिक्षण मिळणार आहे. हे शिक्षण केवळ पाश्चात्य अभ्यासक्रमाची प्रतिकृती न राहता, भारतातील स्थानिक औद्योगिक गरजांशी सुसंगत असेल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. नवी मुंबईची ओळख आता केवळ वित्तीय किंवा औद्योगिक केंद्र म्हणून मर्यादित न राहता, ती एक ‘जागतिक ज्ञाननगरी’ म्हणून विकसित होत आहे.

नवी मुंबईतील प्रगत पायाभूत सुविधा, अटल सेतू आणि येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे या एज्युसिटी हबला जागतिक कनेक्टिव्हिटी लाभली आहे. याच परिसराचा विस्तार करताना भविष्यात येथे मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक कार्यबलासाठी सक्षम बनवले जाईलच, शिवाय ‘विकसित भारत २०४७’ आणि महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल. पाच देशांतील पाच विविध संस्कृतींच्या विद्यापीठांचे एकत्र येणे म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’चा एक प्रकारे शैक्षणिक आविष्कारच आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ही वाटचाल नवी मुंबईला ज्ञानाचे जागतिक केंद्र बनवून भारतीय तरुणांच्या आकांक्षांना नवी क्षितीजे प्रदान करणारी ठरणार आहे.

नवी मुंबई 'मेट्रोपॉलिटन सेंटर'

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *