इन्फ्रा मॅन | तिसरी मुंबई

‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन; ‘नैना’तून १५ लाख रोजगार निर्मिती!

महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती आणि दिशा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात उभारली जाणारी ‘तिसरी मुंबई’ (मुंबई ३.o) ही राज्याची नवे ग्रोथ इंजिन म्हणून आकारास येत आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण या तालुक्यांमधील १२४ हून अधिक गावांचा समावेश असलेल्या सुमारे ३२३ चौरस किलोमीटर क्षेत्रात कर्नाळा-साई-चिरनेर (KSC) न्यू टाउन आणि नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) क्षेत्राचा विकास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला जात आहे. अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या भव्य प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर आकारास येणारे हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक दळणवळण व्यवस्था आणि आर्थिक संपन्नतेचे केंद्र ठरणार आहे.

विविध संकल्पनांवर आधारित विशेष झोन

नैना म्हणजेच तिसरी मुंबई प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातून निर्माण होणारी प्रचंड रोजगारनिर्मिती. सुनियोजित नगररचना आणि औद्योगिक-व्यावसायिक गुंतवणुकीच्या माध्यमातून या भागात तब्बल १५ लाख नव्या रोजगार संधी निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये उच्च तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रावर आधारित ५ लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्यांचा समावेश असणार आहे. यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना या विकासात अग्रक्रम दिला जाणार आहे. हा विकास फक्त इन्फ्रा पुरता मर्यादित नाही. येथे एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी, नॉलेज सिटी, ग्लोबल फायनान्शियल हब आणि अद्ययावत डेटा सेंटर्स यासारख्या विविध संकल्पनांवर आधारित विशेष झोन उभारले जात आहेत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, फायनान्स आणि क्रीडा क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा संपूर्ण पट्टा राज्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरणार आहे.

तिसरी मुंबई प्रकल्प: नैना क्षेत्रातून १५ लाख रोजगार संधी

नैना – नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा शेजारील परिसराचा नियोजित विकास करण्यासाठी हा परिसर अधिसूचित केला होता. त्यानुसार या जागेत विकास प्रकल्प राबविले जात आहेत. नैना या अधिसूचित क्षेत्रात रायगड, ठाणे जिल्ह्यातील आणि उरण तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. या भागाला तिसरी मुंबई म्हणून ओळखले जाते. या परिसाच्या विकासाची जबाबदारी सिडको कडे सोपविण्यात आली आहे. मुंबईतून अटल सेतूच्या माध्यमातून नैना परिसरात थेट आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणारे उन्नत मार्ग आणि उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग ४बी, जेएनपीटी बंदर आणि प्रस्तावित उपनगरीय रेल्वे मार्ग अशा वेगवेगळ्या दळणवळणाच्या सुविधा तयार केल्या जात आहेत. थोडक्यात सांगायचे तर, विमानतळामुळे येणारा प्रचंड नागरी व औद्योगिक ताण पेलण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले नवे शहर निर्माण करण्यासाठी आखलेला बृहत विकास प्रकल्प म्हणजे ‘नैना’ प्रकल्प.

नैना क्षेत्राची महत्त्वाची वैशिष्ट्ये

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी पूर्वेकडून वेगवान, सिग्नलविरहित आणि अखंड संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सिडकोने ९५३ कोटी रुपये खर्चाचा एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ या पुलांचा महाप्रकल्प विकसित केला आहे. पनवेल खाडीवरून उभारण्यात आलेल्या या ६० मीटर रुंद आणि दोन्ही बाजूंना चार-चार मार्गिका असलेल्या भव्य पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे व कल्याण भागातून येणाऱ्या वाहतुकीला थेट विमानतळ, उलवे किनारी मार्ग आणि अटल सेतूशी जोडणे शक्य झाले आहे. १०० मीटर व्यासाचे मध्यवर्ती वाहतूक बेट आणि क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे हा प्रवास अधिक गतिमान झाला आहे. याशिवाय, द्रोणागिरी ते उरण दरम्यान उभारण्यात आलेल्या ५०.२६ कोटी रुपयांच्या उरण बायपास पुलामुळे जेएनपीटी बंदर आणि स्थानिक परिसरातील जड वाहतुकीच्या कोंडीतून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे.

विकासाची ही नवी पहाट अवतरताना शेतकऱ्यांचा आणि स्थानिक भूधारकांचा विश्वास संपादन करून त्यांना थेट विकासाचे भागीदार बनविण्यावर भर दिला गेला आहे. जमिनीची मोजणी, मालकी नोंदी आणि मालमत्ता पत्रकांचे थेट वाटप करून प्रशासनाने भूधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. अशा रीतीने स्थानिक जनतेचे हित जपत, पर्यावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल साधत उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ येत्या काळात रोजगार, पायाभूत सुविधा आणि आर्थिक समृद्धीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाची नवी यशोगाथा ठरणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *