मराठा आणि कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी २०१८ मध्ये स्थापन झालेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेने (सारथी) केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, कर्मचारी निवड आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे. सारथीने विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग सुकर करण्यात मोलाची कामगिरी केली आहे.
सारथीची स्थापना कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत राज्य सरकारची स्वायत्ता संस्था म्हणून करण्यात आली आहे. ही संस्था ११ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यान्वित झाली आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था काम करते. या संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व विद्यावेतन, एकवेळ आर्थिक सहाय्य, उच्च शिक्षण व संशोधन, शालेय शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन अशा विविध क्षेत्रातील उपक्रम राबवत आहे. हे उपक्रम कोणासाठी आहेत? यासाठी पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा? या विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
सारथीमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रमुख योजना
| प्रवर्गाचे नाव | प्रमुख योजना | स्वरूप व लाभ |
| स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व विद्यावेतन | • UPSC CSE (दिल्ली व पुणे) • MPSC (राज्यसेवा, गट-ब/क, अभियांत्रिकी, न्यायिक सेवा) • बँकिंग, IBPS, रेल्वे, CDS/NDA प्रशिक्षण | • नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत मोफत कोचिंग. • दरमहा १०,००० ते १३,००० विद्यावेतन. • आकस्मिक खर्च व दिल्ली प्रशिक्षणासाठी प्रवास भत्ता. |
| एकवेळ आर्थिक सहाय्य | UPSC / MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सहाय्य | • मुख्य परीक्षा तयारीसाठी १५,००० ते ५०,००० चे एकरकमी सहाय्य. • मुलाखत (Interview) तयारीसाठी १०,००० ते २५,००० सहाय्य. |
| उच्च शिक्षण व संशोधनासाठी फेलोशिप | • CSMS-JRF / SRF फेलोशिप (Ph.D. / M.Phil. विद्यार्थी) • छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती | • UGC निकषांप्रमाणे Ph.D. संशोधकांसाठी दरमहा ३१,००० ते ३५,००० + HRA. • जागतिक मानांकनप्राप्त परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेण्यासाठी शिक्षण शुल्क आणि निर्वाह भत्ता. |
| शालेय शिष्यवृत्ती | छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना (इयत्ता ९ वी ते १२ वी) | • NMMS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दरमहा आर्थिक मदत (वर्षभरात विहित शिष्यवृत्ती). |
| कौशल्य विकास व रोजगार | CSMS-DEEP आणि विविध तांत्रिक / IT कौशल्य कार्यक्रम | • MKCL, नामांकित IT कंपन्या आणि विद्यापीठांशी संलग्न मोफत रोजगारक्षम कौशल्य अभ्यासक्रम. |
प्रमुख पात्रता निकष
- उमेदवार हा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा या प्रवर्गातील असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. त्याच्याकडे महाराष्ट्र अधिवास दाखला (डोमिसाईल प्रमाणपत्र असावे.
- बहुतांश योजनांसाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे.
- शालेय व दहावी-अकरावीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा वेगळी असू शकते.
- विद्यार्थ्याकडे नॉन-क्रिमिलेअर / उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक.
शैक्षणिक व इतर पात्रता
- स्पर्धा परीक्षांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
- फेलोशिपसाठी नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित विद्यापीठात पीएचडीसाठी नोंद केलेली असावी.
- कौशल्य विकासविषयक उपक्रमासाठी सदर विद्यार्थ्याची शैक्षणिक पात्रता योजनेनुसार किमान दहावी, बारावी किंवा आयटीआय किंवा पदविका असावी.
- स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व फेलोशिपसाठी अर्जदार कोणत्याही पूर्णवेळ अथवा अर्धवेळ शासकीय/खाजगी सेवेत नसावा.
- स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी बहुतांश वेळा सारथीमार्फत स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाते व गुणवत्तेनुसार निवड होते.
सारथीच्या योजनांची मुख्य वैशिष्ट्ये
- विद्यावेतन आणि शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा होते.
- सारथीच्या सर्व योजनांमध्ये महिलांसाठी ३० टक्के, दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि अनाथांसाठी १ टक्के समांतर आरक्षण लागू.
- सामाजिक, कृषी आणि स्थानिक समस्यांवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते.
- अर्ज नोंदणी, कागदपत्र पडताळणी आणि निकाल प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावरून पारदर्शकपणे राबवली जाते.
ऑनलाईन अर्जप्रक्रिया
सारथी संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. योजनांच्या स्वरूपानुसार अर्ज करण्याची पद्धत काही प्रमाणात बदलते.
- सारथी संस्थेच्या अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती / अधिसूचना पाहा. जाहिरातीमध्ये संबंधित योजनेची अंतिम मुदत, पात्रता आणि अटी पाहा.
- पोर्टलवर जाऊन ‘New Registration’ किंवा संबंधित योजनेच्या ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा. स्वत:ची प्राथमिक माहिती भरा. ओटीपीच्या मदतीने खाते सक्रिया करा.
- लॉग-इन केल्यानंतर अर्जात दिलेली वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, पत्ता, जात प्रवर्ग) भरा.
- सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार वार्षिक उत्पन्न नमूद करा.
- शैक्षणिक अर्हतेमध्ये १० वी, १२ वी, पदवी किंवा पीएचडीची माहिती द्या.
- आवश्यक कागदपत्रांच्या (जात प्रमाणपत्र व वैध नॉन-क्रिमीलेअर / उत्पन्न दाखला, अधिवास दाखला (डोमिसाईल), पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी, पदवी/पीएचडी नोंदणी पत्र व गुणपत्रके) स्कॅन केलेल्या प्रती पीडीएफ किंवा जेपीजी फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- भरलेली माहिती तपासून सबमिट करा. अर्ज पूर्ण झाल्यावर Application ID / Registration Number मिळेल. भरलेल्या अर्जाची छापील प्रत पुढील प्रक्रियेसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी डाऊनलोड करून ठेवा.
संबंधित लेख:
