नवी मुंबई एअरपोर्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: स्वप्नपूर्ती, आधुनिक साज आणि इंजिनियरिंग मार्व्हल!

महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक मैलाचा दगड ठरणारा प्रकल्प आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ चर्चेत असलेला हा प्रकल्प अनेक प्रशासकीय, पर्यावरणीय आणि भूसंपादनाशी संबंधित अडथळ्यांवर मात करत अखेर साकार झाला. मुंबईतील सध्याच्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक स्तरावर अधिक सक्षम हवाई यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. १९९७ मध्ये मांडण्यात आलेल्या संकल्पनेपासून ते २०२५ मध्ये झालेल्या उद्घाटनापर्यंतचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा प्रवास महाराष्ट्राची विकासदृष्टी, नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीचे प्रतीक मानला जातो. विशेषकरून इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागले. केंद्र सरकार आणि पर्यावरणाच्यादृष्टीने आवश्यक परवानग्या मिळवण्यात आणि विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीत देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता मर्यादित होत असताना वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर १९९७ मध्ये नवी मुंबई येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडण्यात आला होता. २००७ मध्ये त्यावेळच्या तत्कालीन केंद्र सरकारने या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आणि या प्रकल्पासाठी सिडकोची (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. पण तरीही जवळपास १० वर्षे हा प्रकल्प विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे रखडला होता.

नवी मुंबई विमानतळात देवेंद्र फडणवीस यांचे योगदान

२०१४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाचे नशीब पूर्णपणे बदलले. नवी मुंबई विमानतळाचा हा प्रकल्प सरकारी फायलींमध्ये अडकला आहे हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी यात वैयक्तिक लक्ष घातले आणि या विमानतळाला आपल्या सरकारचा मुख्य अजेंडा बनवला. त्यांनी पारंपरिक पद्धतीने जमीन ताब्यात घेण्याऐवजी स्थानिक लोकांसाठी फायदेशीर असे पुनर्वसन पॅकेज जाहीर केले. त्यांच्या देखरेखीखाली सरकारने १० गावांमधील ५ हजारांपेक्षा जास्त बाधित कुटुंबांना हक्काची घरे आणि मोबदला दिला. यामध्ये बाधितांना मूळ घराच्या तिप्पट आकाराचे घर, १८ महिन्यांचे भाडे आणि भरीव आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळे स्थानिकांचा अनेक वर्षांचा विरोध संपुष्टात आला. जमीन संपादनाव्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पातील विविध सरकारी विभागांमधील अडथळे दूर केले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या परवानग्या जलदगतीने मिळवून दिल्या. ९० मीटर उंच असलेल्या उलवेचा डोंगर ब्लास्टिंग करून खाली आणला. त्याचे सपाटीकरण केले, दलदलीची जमीन भरून काढली, उलवे नदीचा प्रवाह बदलून तो मोहा खाडीकडे वळवण्यात आला.

नवी मुंबई एअरपोर्ट वैशिष्ट्ये

सिडकोच्या मदतीने पीपीपी तत्त्वावर एअरपोर्टची उभारणी

इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची आर्थिक कोंडी फोडून जागतिक पातळीवर टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आणि खाजगी विकासकाकडे हे काम सोपवले. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सिडको आणि खाजगी कंपन्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पुढे नेले. २०१७ मध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर झालेल्या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) यांची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयएएल) या विशेष कंपनीची स्थापना केली. सिडकोचा या कंपनीमध्ये २६ टक्के सहभाग ठेवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक असलेले विविध करार ११ एप्रिल २०१८ रोजी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी २०१८ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले.

अत्याधुनिक यंत्रणेचे प्रतिक!

मार्च २०१८ मध्ये जगप्रसिद्ध झाहा हादिद आर्किटेक्ट्स या संस्थेची विमानतळाच्या टर्मिनल आणि हवाई वाहतूक नियंत्रण मनोऱ्याच्या डिझाईनसाठी निवड करण्यात आली. भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या ‘कमळा’पासून प्रेरित होऊन सुंदर डिझाईन बनवण्यात आले. ज्यामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. २०२० मध्ये अदानी समूहाने या प्रकल्पाचे व्यवस्थापन आपल्या हाती घेतले आणि २०२१ मध्ये प्रत्यक्ष टर्मिनल व धावपट्टीच्या बांधकामाला सुरुवात झाली. लार्सन अॅण्ड टुब्रोसारख्या नामांकित कंपनीने विमानतळाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली. भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे विमानतळ वेगवेगळ्या टप्प्यात विकसित केले जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ३ हजार ७०० मीटर लांबीची पहिली धावपट्टी आणि पहिले टर्मिनल बांधून पूर्ण करण्यात आले. ज्याची क्षमता वर्षाला २ कोटी प्रवाशांची आहे. पुढील टप्प्यांमध्ये दुसरी समांतर धावपट्टी आणि नवीन टर्मिनल्स बांधले जाणार आहे. ज्यामुळे या विमानतळाची फायनल क्षमता वर्षाला तब्बल ९ कोटी प्रवासी आणि २० लाख टन मालवाहतूक (कार्गो) हाताळण्याची होणार आहे. याशिवाय, इथे मालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी एआय (AI) तंत्रज्ञान, औषधांसाठी विशेष केंद्र आणि कोल्ड-चेन कार्गो व्हिलेज देखील बनवले जात आहे.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ

स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीचा विचार करून २०२२ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने या विमानतळाचे नामकरण ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ‘, असे करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईच्या विकासात आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याबद्दल दिवंगत दि. बा. पाटील यांना हा सन्मान महायुती सरकारने दिला. धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यावर २०२४ मध्ये विमानांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या, तर २०२५ मध्ये व्यावसायिक विमानांच्या अंतिम ट्रायल रन पूर्ण झाल्या. अखेर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९,६५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. जवळपास ३० वर्षे प्रतिक्षेत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्याने महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवे बळ मिळाले आहे.

एअरपोर्टशी वाहतुकीची कनेक्टिव्हिटी आणि सुविधा

नवी मुंबईमधील हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि इतर शहरांशी जोडण्यासाठी वाहतुकीचे मोठे जाळे तयार करण्यात आले आहे. मुंबईहून इथे येण्यासाठी किंवा नवी मुंबईच्या विमानतळावरून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘अटल सेतू’ (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक)चा फायदा होत आहे. यामुळे दक्षिण मुंबईतून येण्याचा वेळ खूप कमी झाला आहे. तसेच मुंबई मेट्रोच्या नवीन हाय-स्पीड लाईनद्वारे हे विमानतळ थेट मुंबईच्या जुन्या विमानतळाशी जोडले जाणार आहे. यासोबतच सागरी मार्गाने येण्यासाठी वॉटर टॅक्सीची सेवा देखील सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्यामुळे प्रवाशांना रस्ते, रेल्वे आणि पाणी या तिन्ही मार्गांनी इथे सहज पोहोचता येणार आहे. नवी मुंबईचे हे विमानतळ भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ ठरले आहे. जिथे बायोमेट्रिक एंट्री आणि स्वयंचलित किओस्क मशीनचा वापर करण्यात आला आहे. अनेक वर्षांचे स्वप्न आणि परिश्रम यामुळे साकारलेले हे विमानतळ आता महाराष्ट्राच्या व्यापार, पर्यटन आणि आर्थिक प्रगतीचा एक नवा महामार्ग बनले आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *