मुंबईच्या भौगोलिक आणि आर्थिक केंद्रस्थानी असलेल्या धारावीचा पुनर्विकास आता एका नव्या आणि अत्याधुनिक वळणावर येऊन पोहोचला आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याचा संकल्प राज्याचे इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. या संकल्पाच्या माध्यमातून देशातील पहिली मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब इथे साकारली जाणार आहे. धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प हा धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याचे नियोजन करताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. व्यावसायिक विकासापेक्षा लोकहिताला प्राधान्य देत, धारावीतील औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था म्हणजेच इथली इकोसिस्टम, धारावीतील पर्यटन कायम ठेवण्यावर सरकारचा भर राहणार आहे. स्थानिकांचा रोजगार टिकवून तिथल्या उद्योगधंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा, २०२८ पर्यंत १० हजार घरे देणार
धारावी पुनर्विकासाचा हा महाकाय प्रकल्प सर्व विभागांच्या मदतीने पुढील १० वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात मार्च २०२८ पर्यंत काम पूर्ण करून किमान दहा हजार पात्र नागरिकांना हक्काची घरे देण्याचे नियोजन आहे. यामध्ये माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी ३९ महिन्यांचा आणि धारावीतील पुनर्वसन इमारतींसाठी ४२ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुनर्विकासाच्या माध्यमातून पात्र रहिवाशांना नवीन घरात स्वतंत्र किचन, बेडरूम, टॉयलेट-वॉशरूम आणि नैसर्गिक प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रोजेक्टमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. चांगल्या सोयीसुविधा असलेल्या घरांबरोबरच, इथला चामड्याचा उद्योग, गारमेंट इंडस्ट्री, मातीची भांडी आणि वेगवेगळी खाद्यसंस्कृती यांच्यासाठी विशेष अशी एमएसएमई (सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) योजना तयार केली जाणार आहे. इथल्या खाऊ उद्योगाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी येथे ‘क्लाऊड किचन’ची संकल्पना विकसित केली जाणार आहे.
धारावीची संस्कृती आणि पर्यटन जोपासणार
धारावीतील सांस्कृतिक आणि पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या कुंभारवाड्याचे वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार त्यावर योग्य तो निर्णय घेणार आहे. कारण धारावीतील कुंभारवाडा हा इथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र राहिले आहे. यासोबतच, पर्यावरण संतुलनाचा विचार करून या पुनर्वसन प्रकल्पात ‘नेचर पार्क’ उभारले जाणार आहे. ज्यात झाडांचे सायंटिफकली पद्धतीने पुनःरोपण करून आणि नवीन झाडे लावून निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे. धारावी हा परिसर खूपच मोठा असल्याने इथे राबवण्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे परवाने एकाच ठिकाणी आणि जलदगतीने मिळावेत यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. सध्या रेल्वेच्या जमिनीचा विकास, पुनर्वसन इमारतींची बांधकामे, झोपड्यांचे स्थलांतर, रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

देशातील पहिले मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे उभारला जाणारा देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब. या हबमुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर हे तिन्ही रेल्वे मार्ग आणि वेगवेगळे मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तसेच बुलेट ट्रेन भविष्यात धारावीपर्यंत आणण्याचा सरकार विचार करत आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी येथे सिटी चेक-इन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामुळे प्रवाशी धारावीतच आपल्या सामानाची नोंदणी करून एअरपोर्ट एक्सप्रेस द्वारे थेट विमानतळावर पोहोचू शकतील. याशिवाय, जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी उभारली जाणार आहे. भविष्यातील हवाई टॅक्सी सेवा लक्षात घेऊन व्हर्टीपोर्ट देखील विकसित केला जाणार आहे. म्हणजेच रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग आणि हवाई वाहतूक अशा पाच पायाभूत सुविधा असलेले हे मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल.
या वाहतूक क्रांतीसोबतच, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते धारावी परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मध्यभागी हरित पट्टा, प्रशस्त पदपथ आणि आधुनिक वास्तुरचना विकसित केली जाणार आहे. येथील बस डेपोच्या जागेवर आधुनिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जाणार आहेत. या सर्वंकष विकासामुळे धारावीकरांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच, मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळणार आहे.
संबंधित लेख:
