घाटकोपर (पूर्व) येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या मुंबईतील सर्वात मोठ्या व अनेक दशकांपासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी धोरणात्मक निर्णय घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन १४ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनामुळे इथे राहणाऱ्या हजारो झोपडीधारकांचे स्वप्नं प्रत्यक्षात उतरणार आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर परिसरात सुमारे ३१ ते ३३ हेक्टर क्षेत्रावर साधारण १७ हजार झोपड्या आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा घाटकोपर ते ठाणे या दरम्यान विस्तार करण्यासाठी तसेच मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना चालना देण्यासाठी या संपूर्ण परिसराचा एकात्मिक पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सरकारी यंत्रणांकडून विकासकाची भूमिका स्वीकारून राबवण्यात येणारा हा देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मानला जात आहे.

नागरी पुनरुत्थानाचा आदर्शवत प्रकल्प!
या प्रकल्पासाठी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महायुती सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये संयुक्त भागीदारीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये रमाबाई आंबेडकर नगर येथील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीए व एसआरए यांच्या संयुक्त उपक्रमाला अधिकृतरीत्या मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारी मालकीच्या जमिनीवरील २५ टक्के जमीन अधिमूल्य भरण्याबाबत एमएमआरडीएला मोठी सवलत देण्यात आली. या निर्णयामुळे प्रकल्पाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि पुनर्विकासाला वेग मिळाला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८,४९८ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यासाठी एमएमआरडीएने १,५०० कोटी रुपयांच्या कर्जाची सोय देखील केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा प्रकल्प फक्त इमारत उभारण्यापुरता मर्यादित नसून, झोपडीधारकांचे जीवनमान उंचावणारा आणि मुंबईतील नागरी पुनरुत्थानाचा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अनेक वर्षापासून या प्रकल्पाच्या बाबतीत विकासक बदलले, योजना जाहीर झाल्या, पण इथल्या लोकांचे प्रत्यक्ष पुनर्वसन होत नव्हते. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत एमएमआरडीए आणि एसआरएच्या माध्यमातून हा प्रकल्प स्वतः राबवण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले.
पहिल्या टप्प्यात ४,३४५ पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ४,३४५ पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. २२ मजली पुनर्वसित इमारतींमध्ये प्रत्येक कुटुंबाला ३०० चौ. फुटांचे सुसज्ज घर मिळणार आहे. या टप्प्यात सहा इमारती उभारण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये चांगल्या दर्जाचे बांधकाम, आवश्यक नागरी सोयीसुविधा, पार्किंग व्यवस्था, व्यायामशाळा, वाचनालय, समाजमंदिर, आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि उद्याने अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील बांधकामाची जबाबदारी बी. जी. शिर्के समूहाकडे देण्यात आली आहे. भूमिपूजनानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यातील ४,३४५ घरांचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले आहेत. यासाठी सरकारने झोपडीधारकांना दोन वर्षांचे आगाऊ घरभाडे दिले. जेणेकरून सरकारला तिसऱ्या वर्षाचे घरभाडे द्यावे लागणार नाही.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकास प्रकल्प हा केवळ झोपडपट्टी पुनर्वसन नाही, तर मुंबईच्या पूर्व उपनगरांच्या विकासाला चालना देणारा, पूर्वमुक्त मार्गाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा करणारा आणि हजारो कुटुंबांना सुरक्षित, सन्मानाचे घर देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे आणि सरकारी यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आकाराला येत आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी हा प्रकल्प आदर्शवत ठरेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस सरकारला आहे.
संबंधित लेख:
