भारताच्या आर्थिक विकासात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात जेम्स ॲण्ड ज्वेलरी सेक्टरचे योगदान अनन्यसाधारण आहे. या उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र या सेक्टरमध्ये प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत आहे आणि राज्याला या उद्योगाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ‘जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क’ मधून १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास ५० हजार रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
जागतिक ट्रेंडला धरून ‘रत्न व आभूषण धोरण’ जाहीर
भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा ५२ वा ‘इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जेम्स ॲण्ड ज्वेलरी सेक्टरविषयी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. नवी मुंबई येथे एक प्रगत अशी ‘जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क’ उभारले जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिली आहे. आगामी दसऱ्यापासून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. देशातील सर्वाधिक आधुनिक जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योग म्हणून उदयास येणाऱ्या या प्रकल्पाचा मोठा फायदा महाराष्ट्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. या उद्योगाच्या आधुनिक गरजा आणि जागतिक ट्रेंड लक्षात घेऊन राज्य सरकारने स्वतंत्र ‘रत्न व आभूषण धोरण २०२५’ जाहीर केले. या धोरणात पारंपरिक दागिन्यांच्या व्यवसायासोबत प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या महाराष्ट्रातील ‘लॅबग्रोन डायमंड’ उद्योगाला विशेष प्रोत्साहन मिळावे यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा उद्योग देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देतो. त्याचबरोबर टॅक्सच्या माध्यमातून महसूल ही मिळतो. त्यामुळे या उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकारकडून पुरवले जात आहे.
‘भारत डायमंड बोर्स’मुळे या क्षेत्राला गती
भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मुंबई आणि महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील ‘भारत डायमंड बोर्स’ मुळे या क्षेत्राला मोठी गती मिळाली आहे. येथे दररोज सुमारे ३० ते ३५ हजार व्यापारी, कारागीर व कर्मचारी एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम करतात. त्यांच्या मेहनतीमुळे या क्षेत्रातील व्यापार २१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. दिवसेंदिवस त्यात सातत्याने वाढ होत आहे. उद्योग आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी भारत डायमंड बोर्स परिसराला सर्व प्रमुख वाहतूक मार्गांशी जोडण्याची व्यापक योजना आकारास येत आहे. मेट्रो स्थानकातून थेट डायमंड बोर्समध्ये प्रवेशाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांपासून पॉड टॅक्सी सेवा सुरू करून कर्मचाऱ्यांचा प्रवास जलद व सुलभ केला जाणार आहे. याशिवाय बुलेट ट्रेन स्थानक, कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-२), कुर्ला परिसर आणि उत्तर कोस्टल रोड यांना जोडण्यासाठी विशेष बोगद्यांचे नियोजन करण्यात आले. अशा प्रकारे रेल्वे, मेट्रो, रस्ते आणि विमानतळ या सर्व वाहतूक सुविधांशी भारत डायमंड बोर्सला जोडले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या जाणाऱ्या उद्योगांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे हे राज्याचे प्रमुख ध्येय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील धोरणात्मक निर्णय, पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाराष्ट्रातील जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योग प्रगतीची नवी शिखरे सर करत आहे.
