गुंतवणूक गाथा

महाराष्ट्र-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी: प्रगतीच्या नव्या दिशा

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आता आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलले आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या मुंबई दौऱ्याने दोन्ही देशांमधील ‘एन्हान्स्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेटेजिक पार्टनरशिप’ला बळकटी दिली आहे. या पार्टनरशिपमधून महाराष्ट्र एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून समोर आला आहे. या भेटीत सरकारी पातळीबरोबरच उद्योग विश्वातही मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दक्षिण-पूर्व आशियातून झालेली आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक असो किंवा थेट हवाई संपर्काचा प्रस्ताव, ही भागीदारी येणाऱ्या काळात आशियाई अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे यातून दिसते.

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित ‘इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरम’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडताना व्हिएतनाम हा एक विश्वासार्ह आणि प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचे सांगत व्यापार, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून राज्याला व्हिएतनामच्या प्रगतीचा सहप्रवासी बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेले हे सामंजस्य करार फक्त व्यापारापुरते मर्यादित नाही. तर ते अत्यंत दूरगामी ठरणारे आहेत. विशेषतः व्हिएतनामी कंपनी ‘विनग्रूप’ने महाराष्ट्रात प्रस्तावित केलेली ६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक हा दक्षिण-पूर्व आशियातून झालेला आजवरचा सर्वात मोठा करार मानला जात आहे. ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात व्हिएतनाम गुंतवणूक

देवेंद्र फडणवीस – तो लाम यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींची माहिती देताना औषधनिर्माण (फार्मास्युटिकल), ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन या क्षेत्रांवर विशेष भर दिला. मुंबई आणि पुणे येथील जागतिक दर्जाच्या औषधनिर्माण उद्योगाचा उल्लेख करत, व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, द्विपक्षीय संबंधांना अधिक गती देण्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र व्हिएतनाम व्यावसायिक परिषद’ दरवर्षी मुंबई आणि हो चि मिन्ह सिटी येथे आळीपाळीने आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. या व्यापारिक भागीदारीत फक्त मुंबईच नाही, तर नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि गडचिरोली यासारख्या शहरांमधील औद्योगिक क्षमतांचाही उपयोग करून घेण्याचे आवाहन त्यांनी व्हिएतनाममधील उद्योजकांना केले.

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय सहकार्य आणि सामंजस्य करार

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी तसेच व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (व्हीसीसीआय) भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), असोचॅम आणि इंडियन बिझनेस फोरम (आयबीएफ) यांच्याशी करार केले आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांमधील माहितीची देवाणघेवाण आणि व्यावसायिक संपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

दोन्ही देशांदरम्यान विमान वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली जात आहे. व्हिएतजेट एव्हिएशन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज, तसेच सन ग्रुप आणि जीएमआर ग्रुप यांच्यात विमानतळ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करार झाले आहेत. व्हिएतनाम एअरलाईन्सने जेपी मॉर्गन चेससोबत आर्थिक व्यवस्थापनासाठी, तर सायगॉन टुरिस्ट आणि इनोव्हेशन्स इंडियासोबत सांस्कृतिक व पर्यटन प्रकल्पांसाठी हातमिळवणी केली आहे. विशेषतः नमस्ते व्हिएतनाम सारख्या उपक्रमांतून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. तसेच, विनपर्ल कंपनीने थॉमस कूक आणि एसओटीसी सारख्या संस्थांशी करार करून भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचे ठरवले आहे.

भारतात व्हिएतनाम गुंतवणूक

पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठीही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. व्हिएतनाम मॅरिटाईम कॉर्पोरेशन आणि श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट अथॉरिटी यांच्यात कोलकाता बंदराच्या विकासासाठी करार झाला आहे. तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात व्हिएतनाम फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन आणि हेटेरो लॅब्स यांच्यात उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांच्या वितरणासाठी सहकार्य निश्चित झाले आहे. याव्यतिरिक्त, कृषी क्षेत्रात बायोवे ग्रुप आणि प्रोफेसर जयशंकर तेलंगणा कृषी विद्यापीठ यांच्यात संशोधनासाठी करार झाला आहे. व्यापारातील इतर क्षेत्रांमध्ये, मरिना कॅपिटल आणि ऑल इंडिया स्पाइसेस इम्पोर्टर्स फेडरेशन यांच्यात मसाल्यांच्या निर्यातीसाठी, तर टीव्हीएल कंपनी आणि हेम्पशियर स्टील यांच्यात स्टेनलेस स्टील उत्पादनांच्या विस्तारासाठी करार झाले आहेत. कायदेशीर क्षेत्रात व्यापार विवादांच्या निराकरणासाठी व्हिएतनाम आणि भारत यांच्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रांमध्ये (व्हीआयएसी आणि आयआयएसी) सहमती झाली आहे.

आर्थिक सहकार्यासोबतच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि पर्यटन संबंध अधिक दृढ करण्यावरही या भेटीत भर देण्यात आला. महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा आणि अजिंठा-वेरुळसारखी जागतिक वारसा स्थळे व्हिएतनामी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतात, हे ओळखून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र ‘बौद्ध पर्यटन सर्किट’ विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला पूरक म्हणून छत्रपती संभाजीनगर ते हो चि मिन्ह सिटी दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्तावर ही मांंडण्यात आला आहे. एकूणच, राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चा आणि झालेले सामंजस्य करार एन्हान्स्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेटेजिक पार्टनरशिपला एका नव्या स्तरावर घेऊन जाणारे आहेत. ज्यामुळे आगामी काळात भारत आणि व्हिएतनाममधील व्यापारी संबंधांचे एक नवे सुवर्णयुग अवतरेल.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *