मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारे आणि मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस आता मुंबईत देशातील पहिल्या आणि सर्वांत मोठ्या ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. रस्ते आणि रेल्वेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मुंबईच्या अथांग किनारपट्टीचा वापर करून जलवाहतुकीत क्रांती घडवण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बोटी आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा मिलाफ असलेला हा प्रकल्प मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला एक नवी आणि वेगवान दिशा देणारा ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत वॉटर मेट्रो या महत्त्वाकांक्षी प्रकल्प होऊ घातला आहे. ज्याप्रमाणे मेट्रो रेल्वेने मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलला. त्याच धर्तीवर मुंबईच्या विशाल किनारपट्टीचा वापर करून जलवाहतुकीत क्रांती घडवण्याचा निर्धार मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) तब्बल ३४० किलोमीटर लांबीचे जलमार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यात ११ नवीन मार्ग आणि २४ अत्याधुनिक टर्मिनल्सचा समावेश आहे. नवीन जलमार्गाबरोबर जुन्या १२५ किलोमीटर लांबीच्या २१ मार्गांचे आणि २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण करून ही जलवाहतूक जागतिक दर्जाची केली जाणार आहे.

वॉटर मेट्रो या भव्य प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नॉर्वेस्थित मेसर्स हायके एएस या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीच्या मदतीने आधुनिक, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि हायब्रीड बोटींची बांधणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या २०७ नौकांची बांधणी महाराष्ट्रातच केली जाणार आहे. यासाठी नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग येथे विशेष शिपयार्ड विकसित केले जाणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. सुमारे ३,४३६ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या सागरी पायाभूत सुविधांमुळे २०३१ पर्यंत दरवर्षी सुमारे ७.५ कोटी प्रवासी जलमार्गाचा लाभ घेऊ शकतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. मुंबई वॉटर मेट्रोने प्रवाशांच्या वेळेबरोबरच शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा एक नवा अध्याय देशात सुरू होणार आहे. मुंबईच्या सात बेटांना जलमार्गाने जोडणारा मुंबई वॉटर मेट्रोचा आराखडा पूर्णतः तयार झाला आहे. भविष्यात ही वॉटर मेट्रो मुंबईकरांच्या प्रवासाला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून राबवला जाणारा हा प्रकल्प जगातील मोठ्या जलप्रवासी वाहतूक प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.

संबंधित लेख:
