राज्यातील बळीराजाला कर्जमुक्त करून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यातील निधी वितरणाला सुरुवात केली असून ४,८६,७५७ पात्र शेतकऱ्यांना ४,७६४.७७ कोटींचा थेट लाभ वितरित केला जात आहे.
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाच्या दरातील चढउतारामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ही योजना अत्यंत दिलासादायक ठरली आहे. सरकारने यापूर्वी राबवलेल्या पहिल्या तीन टप्प्यांत लाखो अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यांवर आधार प्रमाणीकरण आणि डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकपणे कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी जमा केली. मागील टप्प्यांत प्रामुख्याने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तसेच थकीत कर्जाची खाती टप्प्याटप्प्याने निकाली काढण्यात आली. सरकारने पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या ट्प्प्यात ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या टप्प्यात ३ लाख ५१ हजार १९२ आणि चौथ्या टप्प्यात ४,८६,७५७ पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. या योजनेतून आतापर्यंत जवळपास २०,७२,२५० पात्र शेतकऱ्यांना १८,०४०.२१ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे.
कर्जाच्या विळख्यातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतीचा उत्पादन खर्च भागवणे आणि शेतीत नवी गुंतवणूक करणे यामुळे शक्य होणार आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे.
संबंधित लेख:
