नाशिक | हिंदुत्ववादी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७: भव्य दिव्य वातावरणात ऐतिहासिक धर्मध्वजारोहण

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत २०२७ मध्ये भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठीच नाही, तर जगभरातील कोट्यवधी भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. या कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य सरकारने यासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक महा-आराखडा मंजूर केला आहे. या भव्य पर्वाची नांदी परंपरेनुसार रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील धर्मध्वजारोहण सोहळ्याने झाली. या ऐतिहासिक पर्वाची सुरूवात ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या रामतीर्थावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाच्या माध्यमातून झाली.

गोदाघाटावर विश्वविक्रमी महाआरती!

पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळासाठी गोदावरीच्या पावन तीरावर साधारण १२ ते १५ कोटी भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. ही विराट गर्दी लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व तयारी हाती घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि भारतीय संस्कृतीचे जतन यांचा त्रिवेणी संगम या आयोजनातून साधला जात आहे. सिंहस्थ पर्वाची ऐतिहासिक सुरूवात तर झाली. या देदीप्यमान सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत, महामंडलेश्वर आणि हजारो भाविक उपस्थित होते. कुंभमेळाचे महत्त्व अधोरेखित करताना निसर्ग, पर्यावरण आणि संस्कृती यांच्या संतुलनाचा संदेश यावेळी देण्यात आला. तर संध्याकाळी गोदावरीच्या तीरी मंत्रमुग्ध करणाऱ्या महाआरतीने आणि दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. हा सोहळा विश्वविक्रमी ठरला. यावेळी नजीकच्या ६५० गावांमधून जवळपास ६५०० आदिवासी बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते.

कुंभमेळासाठी ३५ हजार कोटींचा महा-आराखडा

या महाकुंभमेळ्याच्या सुनियोजित अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. प्रशासकीय स्तरावर कामांना गती देण्यासाठी मंत्रिमंडळाने स्वतंत्र ‘सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणा’ची स्थापना केली. ज्यामुळे सर्व विभागांमध्ये उत्तम समन्वय साधला जात आहे. याशिवाय, नगरविकास विभागाने तातडीच्या विकासकामांसाठी पहिल्या टप्प्यातील निधीला मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कुंभमेळासाठी मिळून सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक महा-आराखडा तयार केला आहे. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसराचा कायापालट होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही नमूद केले आहे की, हा सोहळा फक्त धार्मिक नसून, तो महाराष्ट्राच्या आदरातिथ्याची आणि सक्षम व्यवस्थापनाची जागतिक ओळख ठरणार आहे. यासाठी गोदावरी नदीच्या घाटांचे रुंदीकरण, ‘रामकाल पथ’ प्रकल्पाची निर्मिती, बाह्यवळण रस्ते आणि प्रशस्त उड्डाणपुलांचे जाळे उभारले जात आहे. देशभरातून येणाऱ्या १३ आखाड्यांतील साधू-संतांच्या निवासासाठी तपोवन आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अद्ययावत सुविधांनी युक्त अशी ‘साधुग्राम’ची उभारणी प्रगतिपथावर आहे. तसेच, गोदावरीच्या पावित्र्यासाठी ‘निर्मल गोदावरी’ अभियानांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून होणारी भक्कम निधीची तरतूद आणि महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काटेकोर नियोजनामुळे हा आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, हरित आणि संस्मरणीय ठरेल.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा धर्मध्वजारोहण

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *