पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी तसेच किसान क्रेडिट कार्ड यासारख्या सर्व शेतकरी सरकारी योजनांचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रियेमध्ये आधार कार्ड, सातबारा उतारा आणि शेतकरी ई-केवायसी पूर्ण करून सहजपणे फार्मर आयडी काढता येतो. या प्रक्रियेच्या आधारे भविष्यातील सर्व शेतीविषयक अनुदाने थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहेत.
सरकारी योजनांसाठी ‘ही’ प्रक्रिया अनिवार्य!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीविषयक व इतर विभागांच्या योजनांचा पारदर्शक व थेट लाभ मिळावा, यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) प्रकल्पांतर्गत सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC) करणे आणि फार्मर आयडी (Farmer ID) काढणे अनिवार्य केले आहे. विशेषतः नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत तसेच अग्रीम मदत थेट त्यांच्या बँक खात्यात विनाअडथळा जमा होण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीवरील माहिती अद्ययावत करण्याबाबत आवाहन केले.
अन्यथा ‘या’ योजनांचा मिळणार नाही लाभ
युनिक ११ अंकी फार्मर आयडीमुळे शेतकऱ्याचा आधार क्रमांक, बँक खाते आणि त्यांच्या नावावरील सर्व शेतजमिनीचे ७/१२ व ८-अ उतारे डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे आगामी काळात फार्मर आयडी नोंदणीशिवाय महत्त्वाच्या सरकारी योजनांचे पैसे किंवा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. यामध्ये दुष्काळी मदत व अतिवृष्टी नुकसान भरपाईसोबतच केंद्र सरकारची ‘पीएम किसान सन्मान निधी’ आणि राज्य सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ यासारख्या थेट आर्थिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा उतरवणे व नुकसान भरपाई मिळवणे, बँकांमार्फत किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक कर्ज घेणे, सरकारी खरेदी केंद्रावर हमीभावाने धान, कापूस किंवा सोयाबीन विक्री करून त्यावरील बोनस मिळवणे तसेच महाडीबीटी पोर्टलवरील ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, अवजारे, शेततळे आणि बियाणे-खते अनुदानासाठीही फार्मर आयडी हा मुख्य पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.
फार्मर आयडी नोंदणी कशी करावी?
फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असून त्यासाठी शेतकऱ्यांकडे मूळ आधार कार्ड, आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचे चालू ७/१२ व ८-अ उतारे असणे आवश्यक आहे. शेतकरी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC), महा ई-सेवा केंद्र, गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी कार्यालयात जाऊन आधार पडताळणी व जमिनीचे सर्व गट क्रमांक जोडून ही नोंदणी पूर्ण करू शकतात. ज्या शेतकऱ्यांची जमीन एकापेक्षा जास्त गावांमध्ये किंवा गट क्रमांकांमध्ये आहे, त्यांनी नोंदणी करताना ते सर्व गट क्रमांक एकाच वेळी जोडणे आवश्यक आहे. तसेच ॲग्रीस्टॅकच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शेतकरी स्वतःही आधार ओटीपी आणि ई-साईनच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
अर्ज सादर केल्यानंतर महसूल व कृषी विभागाकडून जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज येऊन ११ अंकी युनिक फार्मर आयडी तयार होतो. ही प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास राज्य सरकारकद्वारे मदत केली जाते. त्यामुळे कोणत्याही अडचणीमुळे नोंदणी अपूर्ण न ठेवता, सरकारच्या सर्व योजनांचा लाभ वेळेत आणि सुरळीतपणे मिळवण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देऊन आपला फार्मर आयडी व ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावी.
संबंधित लेख:
