महाराष्ट्र सरकारची ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ ही राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व शाश्वत वीज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि केंद्र सरकारच्या पीएम-कुसुम योजनेचा एक भाग आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार सौर कृषी पंपाच्या एकूण खर्चावर ९० ते ९५% पर्यंत सरकारी अनुदान देते. सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तींना या योजनेंतर्गत ९० टक्के तर अनुसूचित जाती आणि जमातीतील व्यक्तींना ९५ टक्के अनुदान सरकार देते. सर्वसाधारण गटातील व्यक्तींना सौर कृषी पंपासाठी त्याच्या एकूण खर्चापैकी फक्त १० टक्के रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती – जमातीतील व्यक्तींना यासाठी ५ टक्के रक्कम भरावी लागते.
जमिनीनुसार शेतकऱ्याला सौर कृषी पंपाचा पुरवठा
शेतकऱ्याच्या ७/१२ वरील जमिनीच्या धारण क्षेत्रानुसार (Landholding) सौर कृषी पंपाची क्षमता ठरवून त्यानुसार शेतकऱ्याला त्या क्षमतेचा पंप उपलब्ध करून दिला जातो.
- २.५ एकरपर्यंत जमीन: ३ HP (हॉर्स पॉवर) सौर पंप
- २.५१ ते ५ एकरपर्यंत जमीन: ५ HP सौर पंप
- ५ एकरपेक्षा जास्त जमीन: ७.५ HP सौर पंप

योजनेसाठी शेतकऱ्याची पात्रता
१. अर्जदार महाराष्ट्रात राहणारा आणि महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे.
२. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर, कूपनलिका (बोरवेल) किंवा इतर शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असावा.
३. या योजनेसाठी पारंपरिक विजेचे कनेक्शन नसलेले किंवा महावितरणकडे वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रतीक्षा यादीत असलेले शेतकरी प्राधान्याने पात्र आहेत.
४. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्याने यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
५. शेतीला लागणारे पाणी सामायिक स्वरूपात उपलब्ध असल्यास किंवा सामायिक विहीर असल्यास इतर सर्व भागीदारांचे संमतीपत्र (एनओसी) जोडून एका भागीदाराला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- नुकताच किंवा महिन्याभरापूर्वी काढलेला अद्ययावत ७/१२ आणि ८-अ उतारा
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे बँक पासबुक (आधार कार्डशी लिंक असलेले खाते)
- अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
- सामायिक विहीर किंवा सामायिक शेतजमीन असल्यास संमतीपत्र (एनओसी)
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने महावितरणच्या (MSEDCL) अधिकृत पोर्टलवरून करता येतो.
१. सर्वप्रथम महावितरणच्या अधिकृत वेबसाईट MSEDCL Solar Portal ला भेट द्या.
२. लाभार्थी सुविधा या टॅब अंतर्गत असलेल्या नवीन अर्ज (Apply Online) पर्यायावर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरा.
३. तुमचा जिल्हा, तालुका, गाव, गट क्रमांक आणि जमिनीची माहिती क्षेत्रफळ, सिंचन आदी भरा.
४. जमिनीचा ७/१२, बँक पासबुक, आधार कार्ड व जातीचे प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.
५. सर्व माहिती योग्य पद्धतीने भरली आहे का हे तपासून फॉर्म सबमिट करा.
६. महावितरणद्वारे अर्जाची छाननी व जागेची पाहणी झाल्यानंतर, मंजुरी मिळताच ५% किंवा १०% लाभार्थी वाटा ऑनलाईन भरणे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे
- दिवसभर अखंडित वीज मिळते. रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्याच्या त्रासापासून सुटका.
- कृषी पंपाचे वीज बिल शून्य. पंप सौर ऊर्जेवर चालत असल्याने कोणतेही वीज बिल भरावे लागत नाही.
- ५ वर्षांची वॉरंटी व विमा: सौर पंप आणि सोलर पॅनेलची ५ वर्षांपर्यंत कंपनीकडून मोफत दुरुस्ती, देखभाल व विमा संरक्षण.
- डिझेल पंपाच्या खर्चात बचत आणि लोडशेडिंगच्या समस्येतून कायमची सुटका.
संबंधित लेख:
