कृषिगाथा | महाराष्ट्र सेवक

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना; जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे व अर्जप्रक्रिया

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही विशेषकरून राज्यातील शेतकरी / भूमिहीन शेतमजूर / महिला शेतकरी यांना अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान देणारी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये २०१५ मध्ये ही योजना गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने आणली होती. शेती व्यवसाय करताना, कामाच्या ठिकाणी होणारे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक आधार देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया जाणून घेणार आहोत.

शेती करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, तर काही अपघातांमुळे शेतकऱ्यांंना कायमचे अपंगत्व येते. अशाप्रकारे घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन तर बंद होतेच. पण त्याचबरोबर अपघातग्रस्त शेतकऱ्याकडे कोणताही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे राज्य सरकारने ही योजना सुरू करून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आणि अपघातग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्य सरकार २ लाख रुपयांपर्यंत मदत करते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने १० ते ७५ वर्षे असा वयोगट निश्चित
७/१२ उताऱ्यावर नोंद असलेले शेतकरी योजनेसाठी पात्र
असंघटित कामगार (e-Shram) पोर्टल वर १ वर्षाच्या आत नोंदणी केलेले भूमिहीन शेतमजूर पात्र
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र प्राप्त महिला पात्र
वरील घटकांच्या कुटुंबातील आई-वडील, पती / पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, घटस्फोटीत मुलगी व विधवा मुलगी पात्र

लाभार्थ्याला मिळणारी आर्थिक मदत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघाताच्या स्वरूपानुसार संबंधितांना पुढीलप्रमाणे मदत दिली जाते.

  • अपघाती मृत्यू – रु. २,००,०००/-   
  • दोन डोळे निकामी होणे – रु. २,००,०००/-   
  • दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे – रु. २,००,०००/-
  • एक डोळा निकामी होणे – रु. २,००,०००/-   
  • एक हात किंवा एक पाय निकामी होणे – रु. २,००,०००/-
  • एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे – रु. १,००,०००/-   

योजनेखाली पात्र असणारे अपघात

  • रस्ता / रेल्वे अपघात 
  • पाण्यात बुडून मृत्यू 
  • जंतूनाशके हाताळताना 
  • इतर कारणांमुळे विषबाधा
  • विजेचा धक्का बसणे 
  • वीज पडून मृत्यू
  • सर्पदंश, विंचूदंश
  • उंचावरून पडून मृत्यू
  • जनावरांच्या हल्ल्यामुळे होणारा मृत्यू किंवा अपंगत्व
  • उष्माघात
  • खून
  • नक्षलवाद्यांकडून हत्या
  • दंगलीतील मृत्यू / अपंगत्व
  • बाळंतपणातील मृत्यू

या गोष्टींसाठी योजनेचा लाभ नाही

  • नैसर्गिक मृत्यू 
  • आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या 
  • जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे
  • अमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात
  • गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
  • १० ते १८ वर्षे वयोगटातील व्यक्तीने वाहन चालवताना झालेला अपघात
  • जवळच्या लाभधारकाकडून (उदा. पती/पत्नी, आई/वडील, मुले) झालेला खून
  • जर लाभार्थ्याने सरकारच्या इतर कोणत्याही विभागाच्या अपघात योजनेचा लाभ घेतला असेल तर ते या योजनेसाठी पात्र नाहीत.   

आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचा ७/१२ उतारा 
  • ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र
  • मृत्यूचा दाखला
  • तलाठ्याकडील गाव नमुना ६-क वारस नोंद
  • वयासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला, 
  • e-Shram पोर्टल नोंदणी प्रमाणपत्र
  • महिला शेतकरी प्रमाणपत्र 

अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे

  • इन्क्वेस्ट पंचनामा व पोस्टमार्टमन (शरीर विच्छेदन) अहवाल
  • वाहन अपघातासाठी ड्रायव्हिंग लायसन्स 
  • विषबाधा / खून साठी व्हिसेरा अहवाल व एफआयआर
  • सर्पदंशासाठी सरकारी आरोग्य अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • अपंगत्वासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र 

अर्ज प्रक्रिया

  • अपघाताची घटना घडल्यानंतर संबंधित वारसदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह २ महिन्यांच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर कराणे.
  • घटना घडल्यानंतर महसूल, पोलीस व कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ८ दिवसांत सखोल चौकशी अहवाल तहसीलदारांना सादर करणे आवश्यक.
  • तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समिती ३० दिवसांच्या आत प्रस्तावावर निर्णय घेते.
  • मंजूर सानुग्रह अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते.

नवीन सुधारणा व बदलांचा समावेश

१० सप्टेंबर २०२६ च्या नवीन शासन निर्णयानुसार (G.R.) मंत्रिमंडळाने ४ ऑगस्ट २०२६ च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नवीन सुधारणा व बदलांचा समावेश असलेला शासन निर्णय सरकारने १० सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केला आहे. जसे की, या योजनेचे ना बदलून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, करण्यात आले आहे. या योजनेत e-Shram पोर्टलवर नोंदणी असलेले भूमिहीन शेतमजूर, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत नोंदणी केलेल्या महिला यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पूर्वी ही योजना फक्त १ किंवा २ सदस्यांपुरती मर्यादित होती. ती आता कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी (१० ते ७५ वयोगट) लागू करण्यात आली आहे. ही नवीन सुधारित योजना १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *