हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण आणि भव्य विकासासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखडा टप्पा-२ अंतर्गत १७८ कोटी ३४ लाख २० हजार ४७४ रुपयांच्या भरीव विकासनिधीला मान्यता दिली. यापूर्वी राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पहिल्या टप्प्यासाठी १५ कोटी २१ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली होती, ती कामे प्रगतीपथावर आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील हिंगोली तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास निधीतून मंदिराचा परिसर, पुरातत्त्वीय वास्तू आणि भाविकांसाठीच्या सुविधांचा कायापालट केला जाणार आहे.
औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा कायापालट
हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास टप्पा-२ चा प्रस्ताव समितीकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला उच्चाधिकार आणि शिखर समितीने मान्यता दिल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय शिखर समितीकडे पाठवण्यात आला. शिखर समितीने या विकास आराखड्याला अंतिम मंजुरी दिल्यानंतर नियोजन विभागाने १७८.३४ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. या संपूर्ण विकास कामांच्या अंमलबजावणी व संनियंत्रणाची मुख्य जबाबदारी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती याच्या कामावर लक्ष ठेवणार आहे.

प्राचीन वारसा जतन आणि सुशोभीकरण
या विकास आराखड्यांतर्गत पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.
- मंदिराच्या मुख्य आवारातील नंदी मंडप
- ओवरी आणि दर्शन बारी संवर्धन
- ऐतिहासिक हरीहर तलाव परिसर
- कालिका माता मंदिर
- श्री निळकंठेश्वर मंदिर
- श्री विसोबा खेचर स्वामी मंदिर
- चिंतामणी मंदिराचा जीर्णोद्धार
याशिवाय मंदिराची मूळ प्राचीन स्थापत्यशैली जपण्यासाठी बांधकामावरील कृत्रिम रंग काढून नैसर्गिक मूळ रंग व शिल्पे जतन करण्याच्या उद्देशाने, काम करताना पुरातत्त्वीय नियमांचे पालन केले जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसरात अत्याधुनिक डीएएलआय नियंत्रित वास्तुशिल्प रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली आणि लँडस्केपिंग करण्यात येणार आहे.
भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा
भाविकांच्या सोयीसाठी नवीन मुख्य प्रवेशद्वार, माहिती केंद्र, भव्य दर्शन मंडप, स्वतंत्र व्हिआयपी दर्शन बारी, चप्पल व सामान घर, उपहारगृह, प्रसाधनगृहे आणि आपत्कालीन मार्गांची निर्मिती केली जाणार आहे. परिसराचे सुशोभीकरण करताना स्मार्ट लाईट पोल, अग्निसुरक्षा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि हरित कचरा व्यवस्थापनाचा समावेश करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकल्प २०२६-२७ पासून राबवला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात औंढा नागनाथ परिसराला भव्य धार्मिक व पर्यटन स्थळाचे रूप प्राप्त होईल.
संबंधित लेख:
- ज्योतिर्लिंग विकास आराखडा – धार्मिक परंपरा, सामाजिक समरसता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचा प्रयत्न
- महाराष्ट्राचा राज्य महोत्सव गणेशोत्सवाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा थाट
- महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे संवर्धक!
- नाशिकच्या प्रगतीचा रोडमॅप: मूलभूत सुविधा ते कुंभमेळा २०२७ची भव्य तयारी
