जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने बदल होत असताना देशांच्या प्रगतीसाठी केवळ पारंपरिक व्यापारी संबंध पुरेसे नाहीत. याबरोबर तंत्रज्ञान, नवनवीन कल्पना, संशोधन, गुंतवणूक आणि कुशल मनुष्यबळ यांच्या आधारावर निर्माण होणाऱ्या नवीन भागीदारी या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत नुकतीच पार पडलेली इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद २०२६ भारत आणि अमेरिका आर्थिक संबंधांच्या नव्या पर्वाचे प्रतीक ठरणार आहे.
मुंबईमध्ये १८ ऑगस्ट २०२६ रोजी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अधिवेशन (आयएसीसी राष्ट्रीय अधिवेशन २०२६) पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही भविष्यात भारत अमेरिका व्यापार सहकार्याने, संयुक्त गुंतवणूक, संयुक्त नवकल्पना, संयुक्त विकास आणि संयुक्त निर्मितीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचे नमूद केले.

महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनविणार
भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राची भूमिका ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण राहिली आहे. देशातील प्रमुख औद्योगिक केंद्रे, आर्थिक राजधानी मुंबई, विकसित पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, मजबूत सेवा क्षेत्र आणि वाढते तंत्रज्ञान क्षेत्र यामुळे महाराष्ट्राकडे जागतिक गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र फक्त भारतातील आघाडीचे राज्य म्हणून नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेले एक सक्षम आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या व्यासपीठांच्या माध्यमातून अमेरिका आणि महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान कंपन्या आणि संशोधन संस्थांना एकत्र येण्याची मोठी संधी निर्माण होत आहे.
भारत-अमेरिकेचा गुंतवणुकीपासून सहनिर्मितीपर्यंतचा एकत्रित प्रवास
आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत एका देशाने उत्पादन तयार करणे आणि दुसऱ्या देशाने त्याचा वापर करणे, हे मॉडेल बदलत आहे. भविष्यातील यश हे आता संशोधनापासून उत्पादनापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत विविध देशांनी एकत्र काम करण्यावर अवलंबून असणार आहे. अमेरिकेकडे प्रगत तंत्रज्ञान, भांडवल, संशोधन क्षमता आणि जागतिक बाजारपेठेतील अनुभव आहे. तर भारताकडे मोठी बाजारपेठ, तरुण आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्याचबरोबर वाढती उत्पादन क्षमता आणि वेगाने विकसित होणारी डिजिटल अर्थव्यवस्था आहे. या दोन्ही शक्तींची सांगड घातल्याने फक्त व्यापार वाढणार नाही, तर नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानाची सहनिर्मिती देखील शक्य होणार आहे. यामुळे महाराष्ट्रात सक्षम असे उत्पादन निर्माण करून ते जगभरातील बाजारपेठांपर्यंत पोहचवता येऊ शकते.
भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानात महाराष्ट्रासाठी भरपूर संधी
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर, हेल्थकेअर टेक्नॉलॉजी आणि संशोधन ही क्षेत्रे पुढील दशकातील अर्थव्यवस्थेचा पाया ठरणार आहेत. या क्षेत्रांमध्ये अमेरिका जगातील प्रमुख तंत्रज्ञान शक्तींपैकी एक आहे. तर भारतही वेगाने जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होत आहे. टेक्नोसॅव्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने डिजिटल पायाभूत सोयीसुविधा, उद्योग, स्टार्टअप्स, नवनवीनकल्पना आणि उच्च तंत्रज्ञान सेक्टरमधील गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला आहे. अमेरिकेतील मोठमोठ्या टेक्निकल कंपन्यांचे महाराष्ट्रातील उद्योगधंदे, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था व संशोधन केंद्रे यांना सहकार्य मिळाल्यास इथे रोजगार आणि उद्योगवाढीच्या अनेक नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी
भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे, तरुणाई. जी संपूर्ण जगाला मनुष्यबळ पुरवू शकते. पण बदलत्या उद्योगधंद्यांना पारंपरिक कौशल्यांपेक्षा तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांवर आधारित असे कुशल मनुष्यबळ लागणार आहे. एआय, डेटा सायन्स, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर डिझाईन, सायबर सुरक्षा, बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ टेक यासारख्या सेक्टरमध्ये भारत-अमेरिका सहकार्य वाढल्यास महाराष्ट्रातील तरुणांसाठी जागतिक दर्जाच्या संधी निर्माण होतील. महाराष्ट्रात पारंपरिक उद्योगांपासून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांपर्यंत अफाट असा औद्योगिक पट्टा उपलब्ध आहे. ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, प्रोडक्शन, लॉजिस्टिक्स आणि आरोग्यसेवा यासारख्या सेक्टरमध्ये राज्याची क्षमता मोठी आहे. या क्षमतेला कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि जागतिक संशोधन नेटवर्कशी जोडण्याची वेळ आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जागतिक पटलावर
महाराष्ट्राच्या विकासाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृष्टिकोन फक्त राज्याच्या सीमांपुरता मर्यादित नाही. इथल्या पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उद्योग, तंत्रज्ञान आणि जागतिक भागीदारी यातून महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय आर्थिक नकाशावर अधिक सक्षम स्थान मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जगभरातील नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, यासाठी ते इथे विश्वासार्ह असे वातावरण निर्माण करत आहेत. आधुनिक उद्योगांना प्रोत्साहन देत आहेत. ज्यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारत-अमेरिका आर्थिक सहकार्याचा विस्तार हा महाराष्ट्रासाठी मोठी संधी निर्माण करणारा आहे.
मुंबईत झालेल्या इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स नॅशनल कन्व्हेन्शन २०२६ ने एका व्यापक दिशेकडे लक्ष वेधले आहे. या औद्योगिक विकासाच्या प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी राहण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या व्यासपीठांच्या माध्यमातून निर्माण होणारी भागीदारी महाराष्ट्राला अधिकाधिक गुंतवणूक मिळवून तर देईलच, पण त्याचबरोबर राज्याला नवकल्पना, सहनिर्मिती आणि जागतिक आर्थिक नेतृत्वाच्या नव्या युगात घेऊन जाण्यासाठी मदतीची ठरणार आहे.
संबंधित लेख:
