कर्तव्यदक्षता, शिस्त आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोल्हापूर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाद्वारे २०४ पोलीस कर्मचाऱ्याकरीता सर्व सोयींनी युक्त असे पोलीस कर्मचारी गृहसंकुल उभारण्यात आले. या गृहसंकुलाचे उद्घाटन नुकतेच (रविवार, ९ ऑगस्ट २०२६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक, पराक्रमी आणि प्रेरणादायी स्मृतींना आदरांजली अर्पण करत या नूतन पोलीस वसाहतीला ‘छत्रपती महाराणी ताराराणी’ यांचे नाव देण्यात आले आहे.
१८ मजल्यांच्या दोन टोलेजंग इमारतीत २०४ कर्मचाऱ्यांना घरे
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करत आहे. कोल्हापूरमधील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी छत्रपती महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे ७१ कोटी २८ लाख रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पामध्ये १८ मजल्यांच्या दोन टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यात २०४ पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वसोयींनी युक्त असे हक्काचे आधुनिक घर उपलब्ध करून देण्यात आले. २२ जून २०२२ रोजी या गृहसंकुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली होती. पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावणे आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे या दृष्टीने हा गृहनिर्माण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
पोलिसांच्या कुटुंबासाठी आदर्शवत निवासस्थान
या पोलीस गृहसंकुलात फक्त राहण्याची व्यवस्था नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या आणि आधुनिक गरजा भागवणाऱ्या अनेक प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली असून सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प (एसटीपी) आणि अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा देखील कार्यरत करण्यात आली आहे. याशिवाय, प्रशस्त निवासी सदनिका, सुरक्षित व सुंदर परिसर, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था यामुळे हे गृहसंकुल पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी सर्वसोयींनी युक्त असे एक आदर्श निवासस्थान ठरत आहे.
