टेकसॅव्ही | कृषिगाथा

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ – तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येकाचे जीवन सुरक्षित करण्यावर भर!

शेतात राबणाऱ्या कष्टकरी हातांना आता अत्याधुनिक डेटा आणि एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाची भक्कम जोड मिळत आहे; यामुळे राज्याच्या कृषी आणि सामाजिक क्षेत्रात एक नवी क्रांती घडत आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाचे जीवन सुरक्षित आणि अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. ‘शिक्षा साथी’, ‘कुंभदूत’ आणि ‘महाविस्तार-एआय’ यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र आज तंत्रज्ञानाचे खऱ्या अर्थाने मानवीकरण करत आहे. भविष्यातील संभाव्य आव्हानांचा वेध घेऊन त्यावर आगाऊ मात करणारे भविष्यवेधी प्रशासन म्हणून काम करत आहे. तंत्रज्ञानाच्या या अथांग महाजालात सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एक ‘आदर्श राज्य’ म्हणून प्रस्थापित करणारा ठरत आहे.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या परिषदेत महाराष्ट्राने सर्वांवर आपली वेगळी छाप सोडली आहे. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (महाराष्ट्र एआय धोरण) क्षेत्रात कशाप्रकारे काम करत आहे. याची माहिती उपस्थितांना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेतून महाराष्ट्राचा प्रगत आणि धाडसी दृष्टिकोन मांडला. त्यांनी एआय हे फक्त एक तंत्र नसून ते सामाजिक स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ कसा आहे, हे पटवून सांगितले. या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित शासन कसे काम करत आहे, याबाबत सांगितले. त्याच हेतूने राज्य सरकारने ‘महा ॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९’ जाहीर केले आहे. ज्याद्वारे डेटाचा वापर करून सामान्य शेतकऱ्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगातील अनेक नामांकित दिग्गजांशी संवाद साधला. नवनवीन तंत्रज्ञानाबाबात चर्चा केली. ज्यामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. त्यांनी ‘ओपन एआय’चे प्रमुख सॅम ऑल्टमन यांची भेट घेऊन सरकारी प्रकल्पांसाठी एआय सँडबॉक्स तयार करण्यावर आणि आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी विशेष उपाययोजना करण्यावर चर्चा केली. तसेच त्यांनी ‘आधार’चे जनक नंदन निलेकणी यांच्याशी डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत चर्चा केली. याशिवाय त्यांनी बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ, गुगलचे जेम्स मनिका आणि जागतिक बँकेच्या वरिष्ठ नेत्यांशीही महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षा साथी’ हे एआय साधन सादर केले. जे लहान मुलांच्या शैक्षणिक विकासात मदत करणार आहे. तसेच, नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविकांना माहिती आणि सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘कुंभदूत’ हा एआय सहाय्यक, तसेच शेतीतील विविध अडचणींवर मात करणारे आणि शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करणारे ‘महाविस्तार-एआय’ प्लॅटफॉर्म आधीच २५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यातून त्यांना हवामान आणि कीड नियंत्रणाची अचूक माहिती कशी पुरवली जात आहे, याविषयीची माहिती दिली. विशेष म्हणजे २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असल्याने, या तंत्रज्ञानाद्वारे महिला शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.

महा ॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्याला ‘भविष्यवेधी प्रशासना’कडे कशाप्रकारे नेत आहे, याची ओळख करून दिली. हवामानातील बदल किंवा बाजारातील चढ-उतार यांचा अंदाज घेऊन त्यावर उपाययोजना करणे, हे या प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. माहितीचे एकत्रीकरण आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाराष्ट्र आज संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनत आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. तंत्रज्ञान हे प्रत्येक नागरिकाचे जीवन सुसह्य करण्याचे माध्यम ठरावे, यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *