स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक बैठक २०२६) पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताच्या उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र हेच खऱ्या अर्थाने ‘गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे सिद्ध करत, पहिल्याच दिवशी तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी सामंजस्य करार केले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी संपूर्ण परिषदेच्या कालावधीत १५.७० लाख कोटी रुपयांचे करार झाले होते, मात्र यंदा पहिल्याच दिवशी या आकड्याच्या अत्यंत जवळ पोहोचून महाराष्ट्र सरकारने जागतिक गुंतवणूकदारांचा राज्यावरील विश्वास अधोरेखित केला आहे. या भव्य गुंतवणुकीमुळे राज्यात आगामी काळात विविध क्षेत्रांमध्ये सुमारे १५ लाख रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या दिवशी १९ महत्त्वाचे करार पार पडले. यामध्ये हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी, डेटा सेंटर, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. ही गुंतवणूक फक्त मुंबईपुरती मर्यादित नसून रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगर यांसारख्या राज्यातील विविध भागांसाठी असणार आहे. त्यामुळे प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. गडचिरोलीसारख्या भागात सुरजागड इस्पातच्या माध्यमातून होणारी २० हजार कोटींची गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारे ८ हजार रोजगार हे राज्याच्या संतुलित विकासाचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.

या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत एमएमआरडीएने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेले करार अत्यंत कळीचे ठरणार आहेत. अल्टा कॅपिटल, पंचशील, एसबीजी समूह, सुमिटोमो रियालिटी आणि के. रहेजा यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे. विशेषतः तिसरी मुंबई उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने जो आराखडा तयार केला आहे, त्याला या गुंतवणुकीमुळे मोठे पाठबळ मिळणार आहे. लोढा डेव्हलपर्सने आयटी आणि डेटा सेंटर क्षेत्रात केलेली १ लाख कोटींची गुंतवणूक राज्याच्या डिजिटल क्रांतीला वेग देणारी ठरेल. यासोबतच कार्ल्सबर्ग, कोका-कोला, आयकिया आणि स्कोडा ऑटो यासारख्या जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रातील पोषक वातावरणाचे कौतुक करत आपला विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचा भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस असा उल्लेख केला आहे. जागतिक कंपन्यांना गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हा एक विश्वासार्ह आणि दीर्घकाळाचा भागीदार वाटत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात उभारण्यात आलेली मैत्री (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा) सारखी समर्पित संस्थात्मक व्यवस्था आणि सुलभ व्यापार धोरण. यामुळे पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूकदारांचा मोठा ओघ महाराष्ट्राकडे वळला आहे. आगामी दोन दिवसांत एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि फिनटेक यासारख्या प्रगत क्षेत्रांतील आणखी काही करार अपेक्षित आहेत. यावर्षी दावोसमधून होणारी गुंतवणूक ही गेल्या वर्षीचे विक्रम मोडीत काढणारी ठरेल, असे दिसून येते.

संबंधित लेख:
