लिडरशिप | निष्ठावान कार्यकर्ता | विजयगाथा

महाराष्ट्रात भाजपचा झंझावात: महापालिका निवडणुकीत महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

राज्यात ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या महापालिका निवडणूक २०२६ कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेषकरून मुंबई महानगरपालिकेबाबत खूपच उत्सुकता ताणली गेली होती. तर या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील २९ पैकी २३ महापालिकांमध्ये महायुतीचा विजय झाला असून, त्यांनी निर्विवाद यश मिळवून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हा क्रमांक एकचा पक्ष म्हणून खंबीरपणे उभा राहिला आहे. विशेषत: मुंबई, नवी मुंबई पुणे, नाशिक, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मिळालेल्या या विजयाने केवळ सत्तेची गणितेच बदलली नाहीत, तर आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट केली आहे. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधुंच्या एकत्रित येण्याने भाजपाला अडचण होणार! अशी चर्चा असताना मुंबईत भाजपाने ८९ जागा जिंकून, महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर निश्चित केला आहे. पुण्यातही १६५ पैकी ११८ जागांवर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ पैकी ८४ जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालामुळे मुंबईतील ठाकरे बंधुंच्या प्रयोगाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकजुटीचा प्रयोग पुण्यात फोल ठरला.

मुंबई महापालिकेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष

देशातील सर्वात जुनी आणि श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. अनेक वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या या लढतीत भाजप-शिवसेना युतीने बाजी मारली. मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईकरांनी या भावनिक आवाहनाला विशेष प्रतिसाद न देता विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करत नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवून दिला आहे. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, जळगांव, अहिल्यानगर, जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये आपला झेंडा फडकावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सूक्ष्म रणनीती

भाजपच्या या यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यात यापूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्रजींनी आपल्या चाणक्यनीतीचा दाखला दिला आहे. प्रत्येक महापालिकेची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवून आणि उमेदवारी वाटपात काटेकोर निकष लावून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. छत्रपती संभाजीनगरसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मारलेली मुसंडी हा या निवडणुकीतील सर्वात मोठा चमत्कार मानला जात आहे. तिथल्या नेत्यांना धक्के देत भाजपने आपले अस्तित्व सिद्ध केले. वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने आपला गड राखण्यात यश मिळवले असले, तरी भाजपने २०१७ च्या तुलनेत एका जागेवरून २०२६ मध्ये ४३ जागांवर मजल मारली आहे. महायुतीच्या माध्यमातून भाजपने मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे.

विभागनिहाय भारतीय जनता पक्षाची कामगिरी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०२६ च्या महापालिका निवडणुकीत राज्यातील २८६९ जागांपैकी १४२५ जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील विभागनिहाय विश्लेषणातून असे दिसून येते की, भाजपने आपल्या बालेकिल्ल्यातच विजय नाही मिळवला, तर विरोधकांच्या किल्ल्यालाही चांगलाच सुरुंग लावला आहे.

एमएमआरडीए महापालिका निवडणूक निकाल

मुंबई महानगर प्रदेशात (MMRDA) भाजपने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, आणि पनवेलमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून या पट्ट्यात आपले वर्चस्व राखले आहे. विशेष म्हणजे, कल्याण – डोंबिवलीतही भाजपने ५० जागांपर्यंत मजल मारली असून शिवसेनेच्या बरोबरीने कडवी झुंज दिली आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे आव्हान असले तरी, तिथेही भाजपने ४३ जागा जिंकून आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. २०१७ च्या निवडणुकीत इथे भारतीय जनता पक्षाचा फक्त एक नगरसेवक होता.

एमएमआरडीए महापालिका निवडणूक निकाल

पश्चिम महाराष्ट्र निवडणूक निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने फडणवीसांच्या रणनीतीमुळे मोठे यश मिळवले आहे. पुणे महापालिकेत १६५ पैकी ११९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ पैकी ८४ जागा जिंकून भाजपने पवारांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडले आहे. सोलापूरमध्ये १०२ पैकी ८७ जागा जिंकून भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. २०१७ मध्ये सोलापूरात भाजपचे फक्त ४९ नगरसेवक होते. सांगली-मिरज-कुपवाडमध्ये ३९ जागा, कोल्हापूरमध्ये २६ जागा आणि इचलकरंजी महापालिकेत ६५ पैकी ४३ जागा जिंकून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. अहिल्यानगर महापालिकेत २०१७ मध्ये भाजपचे १४ नगरसेवक होते. ती संख्या आता २५ वर गेली आहे.

पश्चिम महाराष्ट्र निवडणूक निकाल

उत्तर महाराष्ट्र निवडणूक निकाल

उत्तर महाराष्ट्रातही भाजपचा झंझावात कायम राहिला आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव महापालिका पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. मालेगावमध्ये मात्र भाजपला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले असून तिथे स्थानिक पक्षांचे वर्चस्व दिसून आले आहे.

उत्तर महाराष्ट्र निवडणूक निकाल

विदर्भ महापालिका निवडणूक निकाल

देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात भाजपने विरोधकांना नामोहरम केले आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महापालिकेत पुरेशा जागा जिंकून भाजपने विदर्भातील आपले स्थान मजबूत केले आहे. चंद्रपूरमध्ये मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.

विदर्भ महापालिका निवडणूक निकाल

मराठवाडा महापालिका निवडणूक निकाल

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने चमत्कार घडवला आहे. दशकानुदशके शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या शहरात ११५ पैकी ५७ जागा जिंकून भाजपने सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. जालना महापालिकेतही ६५ पैकी ४१ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. लातूर आणि परभणीमध्ये भाजपने आपली उपस्थिती प्रभावीपणे मांडली आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेत २०१७ मध्ये भाजपचे फक्त ६ नगरसेवक होते, आताच्या निवडणुकीत ही संख्या ४५ झाली आहे.

मराठवाडा महापालिका निवडणूक निकाल

२०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने राज्यातील एकूण २८६९ जागांपैकी १४२५ जागांवर विजय मिळवून राज्याच्या राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवण्यापासून ते पुणे, नागपूर आणि नाशिक यासारख्या मोठ्या शहरांत एकहाती सत्ता मिळवण्यापर्यंत सर्वच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसते. योग्य उमेदवारांची निवड, मित्रपक्षांशी समन्वय आणि थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महायुतीला २९ पैकी २३ महापालिका जिंकता आल्या. या निकालातून आगामी काळातील राज्यातील राजकारणाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती राहतील, असे दिसून येते.

२९ महापालिकांचा पक्षनिहाय व विभागनिहाय निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *