मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक राजधानीचे राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेली मुलाखत लक्षवेधी ठरत आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीचे आव्हान, मराठी मतदारांची भूमिका, मुंबईचा महापौर मराठी होणार का? तसेच मुंबईच्या विकासाचा खरा चेहरा कोण? अशा सर्व मुद्द्यांवर मोकळेपणाने आणि ठामपणे आपली भूमिका मांडली. त्यामुळे ही मुलाखत फक्त राजकीय न राहता ती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वशैलीचा, विचारांतील स्पष्टतेचा आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी वाटते. त्याचबरोबर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन मुंबईचा विकास, आंतरराष्ट्रीय शहर म्हणून तिथल्या सोयीसुविधा, पारदर्शक प्रशासन आणि शहराच्या भविष्याबद्दल चर्चा करणाऱ्या या संवादातून मुंबईचे रेखाचित्र स्पष्ट करते.
राज्यातील २९ महापालिकांसह मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारीला पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत राजकीय न ठरता मुंबईच्या विकासाबद्दल या हा माणूस काय आणि कसा विचार करतो. तसेच ते मुंबईकडे कसे पाहतात. मुंबईसाठी त्यांनी स्वत: काय केले आणि वर्षानुवर्षे जे मुंबई आमची म्हणून फक्त बोलबच्चन करत होते, त्यांनी मुंबईसाठी काय केले? राजकारण आणि शहराचा विकास याकडे सर्वसामान्य मुंबईकर कसे पाहतात. अशा सर्व मुद्द्यांवर त्यांनी अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. या मुलाखतपर संवादातून सर्वात ठळकपणे जाणवला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा रोखठोक स्वभाव. प्रश्न कितीही संवेदनशील असो, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे आव्हान, मराठी मतदारांची भूमिका किंवा मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? अशा मुद्द्यांना न टाळता त्यांनी थेट उत्तरे दिली. कोणतीही निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. ती निवडणूक असते आणि ती जिंकण्यासाठीच सर्व तयारीनिशी उतरायचे. हा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून सातत्याने दिसून येत होता. राजकीय प्रश्नांना किंवा विरोधकांच्या आरोपांंना ते आक्रमक भाषेत उत्तर देण्याऐवजी त्याचे वास्तववादी विश्लेषण करतात. आव्हान नाकारण्याऐवजी ते स्वीकारून त्यावर कशी मात करता येईल, असा विचार त्यांच्या उत्तरांतून सातत्याने डोकावत होता.

मुंबईच्या विकासासाठी प्रकल्पांची जंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांमधील स्पष्टता या मुलाखतीतून प्रखरपणे दिसून आली. मुंबईच्या विकासावर बोलताना त्यांनी भूतकाळात केलेली कामे, सध्या सुरू असलेले प्रकल्प आणि भविष्यातील मुंबई शहराबद्दल असलेला दृष्टीकोन त्यांनी मांडला. ‘मुंबईचा विकास कोणी केला?’ या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मुंबईत निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा, सुरु असलेल्या मोठमोठ्या प्रकल्पांची नावे आणि दीर्घकालीन उपाययोजना म्हणून केलेल्या कामांची उदाहरणे त्यांनी दिली. प्रकल्पांचा पाठपुरावा काय असतो. याचे मेट्रो हे एक छान उदाहरण आहे. २०१४ मध्ये मुंबईत ११ किमीची मेट्रो सुरू झाली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी ११ वर्षे लागली. पण २०१४ नंतर महामुंबईमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण होऊ लागले आहे. २०१५ ते २०२५ या १० वर्षात ९० किमी लांबीची मेट्रो सुरू झाली. त्यात भारतातील पहिली ३३ किमी लांबीची भूमिगत मेट्रो देखील सुरू झाली. ही उदाहरणे म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या जुमलेबाज घोषणा नव्हत्या. तर मुंबई आणि मुंबईकरांसाठी प्रत्यक्षात राबवलेल्या प्रकल्पांची नावे सांगून मुंबईचा विकास कोणी केला, हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले.
मराठी वोट बँक आमचीच!
मुंबईतील मराठी माणूस कोणासोबत आहे? या प्रश्नाचे उत्तर देतानाही त्यांनी थेट मुद्द्याच्या गाभ्याला हात घातला. नाही तर अनेकदा राजकारणी अशा प्रश्नांची उत्तरे देताना मुद्दे भरकटवतात. पण देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर ठामपणे सांगितले की, मराठी वोट बँक भाजपचीच आहे. सलग ३ टर्ममध्ये भाजपचे १०० च्या वर जागा निवडून येत आहेत. त्यामुळे मराठी जनता ही भाजपसोबत आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल.., मुंबईचा महापौर हिंदु होईल.. आणि मुंबईचा महापौर मराठी होईल… अशी थेट उत्तरे ही त्यांनी दिली. त्याचबरोबर मराठी अस्मितेचा सन्मान राखत त्यांनी मुंबई हे संधींचे शहर आहे. सर्वसमावेशक विकासाशिवाय तिची प्रगती शक्य नाही, हा विचार ही त्यांनी ठणकावून सांगितला.
‘देवाभाऊ’ ब्रँड नाही, जनतेने दिलेले प्रेम…
याचवेळी राजकारणातील वेगवेगळ्या ब्रँडबाबत जेव्हा त्यांंना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव ब्रँड असल्याचे सांगितले. इतर ठाकरे, पवार, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा देवाभाऊ हा देखील ब्रँड नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हा ब्रँड नाही. देवेंद्र फडणवीस हे जे काही आहेत; ते पक्षामुळे आहेत. भाजपमुळे आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून माझा चेहरा आज दिसतो. पण त्यामागे माझा पक्ष आहे आणि माझी खरी ओळख ही भारतीय जनता पक्ष हीच आहे. देवेंद्र फडणवीस प्रमाणेच, देवाभाऊ हा देखील ब्रँड नाही. ‘देवाभाऊ’ हे महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले प्रेम आहे.

सातत्याने प्रयत्न करून बदल घडवून आणला…
मुंबईसारख्या महानगरातील प्रश्नांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काही अडचणींची कबुलीदेखील दिली. पण त्याचवेळी अशा अडचणींवर मात करून ते त्यावर उपाययोजना करण्यासाठी तितक्या ठामपणे पिच्छा देखील पुरवतात. कोस्टल रोडसारख्या प्रोजेक्टची कित्येक वर्षांपासून नुसतीच चर्चा होत होती. पण त्यासाठी लागणाऱ्या केंद्र सरकारच्या, पर्यावरण विभागाच्या परवानग्या या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत ठाम मांडून, बैठका करून मिळवल्या आहेत. राज्यात आणि देशात काँग्रेसचे सरकारही असतानाही केंद्राकडून परवानग्या मिळत नव्हत्या. पण देवेंद्र फडणवीस यांनी समस्यांची उत्तरे शोधून त्यातून मार्ग काढून ते पूर्णत्वास नेले. २०१४ पूर्वी एमएमआरडीएसारखी संस्था काही ठराविक मर्यादेपर्यंत काम करत होती. या संस्थेची क्षमता असूनही तिचा वापर केला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी याच एमएमआरडीए संस्थेच्या माध्यमातून आज कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू केली आहेत. याबाबत बोलताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे, कोणत्याही समस्या या एका दिवसात सुटत नाहीत, पण सातत्याने त्यावर प्रयत्न केल्यास त्यामध्ये नक्की बदल घडवता येतो. हा त्यांचा दृष्टिकोन खूप काही सांगून जाणारा आहे.
एकूणच, या संवादातून देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व फक्त राजकारणापुरते मर्यादित राहत नाही. त्यांचे स्पष्ट विचार, थेट संवाद, आत्मविश्वास आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांचा संगम त्यातून दिसून येतो.
संबंधित लेख:
