गुंतवणूक गाथा | सोलर मॅन

संभाजीनगरमध्ये एलएनके एनर्जीची १० हजार कोटींची सौर गुंतवणूक!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गुंतवणूक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रासाठी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. जागतिक स्तरावर शाश्वत विकासाची चर्चा होत असताना, भारतातील तीन दिग्गज उद्योजकांनी एकत्र येत ‘एलएनके एनर्जी’ या ऊर्जा कंपनीची स्थापना केली आहे. ही कंपनी महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर एक नवी क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाली असून, पुढील पाच वर्षांत तब्बल १० हजार कोटी रुपयांची अवाढव्य गुंतवणूक राज्यामध्ये केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पहिले पाऊल छत्रपती संभाजीनगरमध्ये (ऑरिक सिटी सौर प्रकल्प) पडणार असून, ६० एकरच्या विस्तीर्ण जागेवर या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

या प्रकल्पाची सर्वात जमेची बाजू म्हणजे यामागे असलेले अनुभवी नेतृत्व. देशातील तीन दिग्गज उद्योजकांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यामध्ये भारतातील कोका-कोलाचे सर्वात मोठे बॉटलर असलेल्या एसएलएमजी बेव्हरेजेसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक परितोष लधानी, आर-एनर्जी डायनॅमिक्सचे अध्यक्ष आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. कुशाग्र नंदन, तसेच बायो-एनर्जी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आर-एनर्जी डायनॅमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण कराड यांचा समावेश आहे. या तिन्ही धुरिणांच्या अनुभवातून साकारणारा हा प्रकल्प फक्त व्यावसायिक नफा कमावण्यासाठी नसून, भारताची ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक स्वयंपूर्णता वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाची अंमलबजावणी हेच या कंपनीचे मुख्य सूत्र असणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील हा प्रकल्प फक्त सौर पॅनल किंवा बॅटरी निर्मितीपुरता मर्यादित नसणार आहे. तो एक ‘एकात्मिक सौर ऊर्जा प्रकल्प’ (Integrated Solar Plant) म्हणून तयार केला जाणार आहे. इथे ६ गिगावॅट क्षमतेचे सौर सेल उत्पादन आणि सौर मॉड्यूल कारखाना तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, सौर ऊर्जा उत्पादनातील महत्त्वाचे घटक असलेले इनगॉट वेफर प्लांट’ निर्मितीसाठीचा विशेष प्लान्ट म्हणजेच सोलर मॅन्युफॅक्चरिंग युनिट ही इथे उभारले जाणार आहे. यामुळे कच्च्या मालासाठी परदेशांतील कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होऊन मेक इन इंडिया सोलर मोहिमेला मोठी बळकटी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि एलएनके एनर्जी यांच्यातील हा सामंजस्य करार राज्याला ‘सोलर कॅपिटल’ बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबईत झालेल्या सुरुवातीच्या करारानंतर, दावोसमध्ये या प्रकल्पाचा विस्तार १० हजार कोटींपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

भविष्यातील नवीकरणीय ऊर्जेची गरज लक्षात घेता, एलएनके एनर्जी फक्त सौर ऊर्जेवर थांबणार नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी काळात ग्रीन हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक प्रणाली (बॅटरी स्टोरेज) आणि शाश्वत हरित इंधन निर्मितीवर कंपनीचा विशेष भर असणार आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे महाराष्ट्रात पर्यावरणापूरक उद्योगांची साखळी निर्माण होण्याबरोबरच स्थानिकांसाठी हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर हे शहर दक्षिण आशियातील एक प्रमुख औद्योगिक आणि स्वच्छ ऊर्जा केंद्र म्हणून नावारूपाला येईल. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारा हा प्रकल्प राज्याच्या शाश्वत प्रगतीचा एक भक्कम आधारस्तंभ ठरणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *