कृषिगाथा | सोलर मॅन

४५,९११ सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्राची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

महाराष्ट्रातील शेती आणि ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली सौर कृषी पंप योजनेचा मोठा वाटा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सिंचनासाठी शाश्वत ऊर्जा पुरवणे आणि शेतीला स्वावलंबी बनवणे या उद्दिष्टांवर आधारित ही योजना आज देशभरात आदर्श ठरली आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्पांना गतिमान पद्धतीने गती मिळत आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात तब्बल ४५,९११ सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्राची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली. महाराष्ट्र सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप, अटल सौर कृषी पंप आणि पीएम कुसुम योजनेमुळे राज्यात सौर ऊर्जा उत्पादनात मोठी वाढ झाली. महावितरणच्या सौर पंप उपक्रमासह या प्रकल्पांनी महाराष्ट्राला सौर ऊर्जा क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवून दिला. देवेंद्र फडणवीस सरकारची ही सौर ऊर्जा क्रांती शेतीला नवसंजीवनी देणारी ठरली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश फुलविणारी, त्यांच्या श्रमाला सुरक्षितता व स्थिरतेची जोड देणारी ऐतिहासिक कामगिरी महाराष्ट्र सरकारने केली आहे.

२०१४ नंतरच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने दिवसा उपलब्ध होणारी, अखंडित आणि माफक दरात वीज उपलब्ध करून देणे गरेजेचे असल्याचे दिसून आले. याच विचारातून शेतीसाठी सौर पंप उपलब्ध करुन देण्याची योजना पुढे आली. या योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक वीज उपलब्ध होऊ शकली. २०१५ मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सौर कृषी पंप योजनेच्या आधारे देवेंद्र फडणवीस सरकारने त्यावेळी राज्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केला होता. त्यावेळी ७,५४० सौर पंपाच्या वितरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. या योजनेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता २०१६ मध्ये सरकारने या उपक्रमाचे ‘अटल सौर कृषी पंप’ असे नामकरण केले. दरम्यान, सरकारने या योजनेच्या माध्यमातून आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांतील, दुर्गम भागातील तसेच पारंपरिक वीजपुरवठा न मिळणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी पंप पोहोचवण्याचे धोरण निश्चित केले. योजनेचा व्याप वाढवून २०१७ मध्ये अतिरिक्त २४६० पंप देण्याकरीता मंजुरी देण्यात आली आणि शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध करण्याची संकल्पना अधिक जोर धरू लागली.

सौर ऊर्जेच्या प्रवासातील निर्णायक कालावधी

२०१८ वर्ष हे या सौर ऊर्जेच्या प्रवासातील निर्णायक वर्ष ठरले. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ७ हजार शेतकऱ्यांना पंप देण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर सरकारने लगेच ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ आणली. ही योजना पूर्णपणे राज्य सरकारची योजना होती. या योजनेंतर्गत ३ वर्षात १ लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सरकारने या योजनेकडे फक्त वीजेला पर्याय देणारी योजना म्हणून पाहिले नाही. तर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेपासून आर्थिक बचतीपर्यंत सर्व गोष्टींवर सकारात्मक परिणाम करणारी योजना म्हणून तिचा विस्तार केला. २०१९ मध्ये या योजनेत सुधारणा करत शेतकऱ्यांच्या घरगुती गरजा लक्षात घेऊन एलईडी डीसी बल्ब, पंखा आणि मोबाईल चार्जिंग सॉकेटसारख्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या. ‘अटल सौर कृषी पंप योजना २’ महाऊर्जावर सोपवून शेतकऱ्यांना अधिक जलद व कार्यक्षम सेवा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याच वर्षी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना टप्पा २ व ३ साठी तब्बल १५३१ कोटींच्या खर्चास मंजुरी देऊन ७५ हजार नवीन पंप बसविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.

एका महिन्यात ४५,९११ सौर कृषी पंप!

२०२४ – २५ मध्ये महाराष्ट्राने सौर ऊर्जा क्षेत्रात एक अद्वितीय झेप घेतली. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेसाठी नोंदणी पोर्टल सुरू केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने राज्यात मोठ्या प्रमाणावर सौर पंपांचे वितरण करण्यात आले. राज्य सरकारने १०० दिवसांत दीड लाख पंप बसविण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण महावितरणने अवघ्या ६० दिवसांत ५३ हजार पंप बसवून हा वेग अभूतपूर्व वाढवला होता. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यात महाराष्ट्रात १ लाख ५० हजारांहून अधिक सौर कृषी पंप बसविण्यात आले. तसेच पीएम कुसुम योजने अंतर्गत देशात बसविलेल्या ९.५ लाख सौर पंपांपैकी तब्बल ७ लाख पंप महाराष्ट्रात बसविण्यात आले. या प्रगतीचा परमोच्च बिंदू नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे एका महिन्यात ४५,९११ सौर कृषी पंप बसविण्यात आले आणि याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राची प्रती स्वीकारली. २०१४ पासून देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या योजनेने आज राज्यातील हजारो शेतकऱ्यांची विजेची मोठी समस्या दूर केली. त्याचबरोबर राज्यात इतकऱ्या मोठ्या संख्येने महिन्याभरात ४५ हजारांहून अधिक सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड बुक नोंदणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

विजेला पर्याय ठरणारी आणि शेतीची पद्धत बदलणारी ही सौर कृषी पंपाची यात्रा देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आकारास आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली, रात्रपाळीची जोखीम कमी झाली, सिंचनाचा वेग वाढला, भूगर्भातील पाणी वापरण्याची क्षमता सुधारली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतकरी आता वीज उत्पादक होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. तर पुढील वर्षात १० लाख सौर कृषी पंप लावण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि राज्याच्या प्रगतीला शेतकऱ्यांचा हातभार लागू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *