गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाच्या छायेतून मुक्त करून तेथे लोकशाहीची मुळे घट्ट करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि पोलीस दलाने आरपारची लढाई पुकारली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केल्यानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद नष्ट झालेला असेल. त्या पार्श्वभूमीवर हे ऑपरेशन फक्त जंगलातील चकमकींपुरते मर्यादित न ठेवता, नक्षलवाद्यांची विचारसरणी आणि त्यांच्या दहशतीची प्रतिके मुळापासून उखडून टाकण्यावर भर दिला आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून गडचिरोलीत नक्षली स्मारक हटाव मोहीम अत्यंत तीव्र करण्यात आली. या मोहिमेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळे आज नक्षलवाद्यांचा गड समजला जाणारा भाग दहशतमुक्त होत आहे.

पोलीस आणि नक्षलवादी यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवादी दुर्गम भागात, गावांच्या वेशीवर किंवा घनदाट जंगलात स्मारके उभारत होती. ही स्मारके स्थानिक आदिवासी तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि गावागावात नक्षलवाद्यांची दहशत कायम ठेवण्यासाठी बांधली जात होती. या स्मारकांच्या माध्यमातून नक्षलवादी स्थानिक तरुणांना नक्षली चळवळीत सहभागी होऊन हौतात्म्य होण्यासाठी आकर्षित करत होते. ही त्यांची एक कार्यपद्धती आहे. यामुळे आकर्षण आणि दहशत अशा दोन्ही गोष्टी पूर्ण होत होत्या. या कार्यपद्धतीला आणि प्रतिकात्मक दहशतीला खीळ लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांनी सुरू केले होते. महाराष्ट्र सरकारने नक्षलमुक्त महाराष्ट्र अभियान आणि गडचिरोली दहशतमुक्त अभियान अतिशय प्रभावीपणे राबवले. यामुळे गडचिरोलीमधून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे. देशातूनही मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपेल, असे दिसून येते. राज्य सरकारने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारत सी-६० कमांडोंकडून नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाई करत नक्षलवाद्यांची स्मारके जमीनदोस्त केली जात आहेत. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे गडचिरोली आता दहशतीच्या सावटातून मुक्त होऊन विकासाच्या एका नवीन पर्वाकडे वेगाने वाटचाल करत आहे.
जानेवारी २०२४ मध्ये पोलिसांनी राबवलेल्या एका विशेष मोहिमेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. अवघ्या १२ ते १५ दिवसांच्या कालावधीत सी-६० या विशेष पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी अत्यंत धाडसाने नक्षलवाद्यांची अनेक स्मारके उद्धवस्त केली होती. गेल्या काही वर्षांतील नक्षलवादी स्मारक हटाव कारवायांचा विचार केला, तर हा आकडा बऱ्यापैकी मोठा असल्याचे सांगितले जाते. यामुळे नक्षलवादाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांना मोठे यश मिळाले. या मोहिमेमागे सरकारने विशेष सुरक्षा दलांना दिलेले आधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘फ्री हॅण्ड’ हे मोठे कारण आहे. सी-६० या कमांडो पथकाने अतिदुर्गम भागात शिरून, नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ही स्मारके जमीनदोस्त केली आहेत. सरकारचा ठाम विश्वास आहे की, जोपर्यंत सामान्य माणसाच्या मनातून नक्षलवादाची भीती जात नाही. तोपर्यंत तिथल्या भागात विकास पोहोचू शकणार नाही. या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांच्या विचारसारणीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या जनजागरण मोहिमेमुळे आणि सरकारच्या विश्वासार्हतेमुळे आता सामान्य गावकरीही नक्षलवाद्यांना न जुमानता ही स्मारके हटवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करत आहेत. काही ठिकाणी तर गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत ही स्मारके पाडून नक्षलवादी विचारसरणीला नाकारले आहे.
ग्रामस्थांनी मिळून तोडले नक्षलवाद्यांचे स्मारक
एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावातील नागरिकांनी नक्षल्यांना विरोध दर्शवत गावाजवळ उभारलेले नक्षली स्मारक २०१७ मध्ये स्वयंस्फूर्तीने तोडले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान बंद पाळला होता. पण या बंदला वेलमागड गावातील नागरिकांचा विरोध होता. हा विरोध तीव्रपणे दर्शविण्यासाठी ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांनी गावाजवळ उभारलेले स्मारक उद्धवस्त केले.

मागील दोन-तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी पेनगुंडा हद्दीतील, तसेच कटेझरी हद्दीतील आणि मर्मा जंगल परिसरात उभारलेली नक्षलवाद्यांची स्मारके नष्ट करून त्या स्मारकांच्या ठिकाणी वृक्षारोपण करत स्थानिकांमध्ये शांतता आणि सुरक्षेचा संदेश दिला. नुकत्याच झालेल्या २६ जानेवारी रोजी बिनागुंडा येथील नक्षलवाद्यांचे स्मारक उद्धवस्त करत गडचिरोली पोलिसांनी तिथे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा केला होता.

नक्षलवाद संपवणे म्हणजे, दहशतीच्या सर्व खाणाखुणा संपवून सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षित आणि स्वातंत्र्यपणे जगण्याचा अनुभव देणे होय. आज हा अनुभव गडचिरोलीतील नागरिक घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नक्षलवादाच्या विरोधात अवलंबलेले झिरो टॉलरन्स धोरण आणि गडचिरोली पोलीस दलाचे अतुलनीय शौर्य यामुळे आज या दुर्गम भागातील चित्र बदलत आहे. नक्षलवादी चळवळ कमकुवत करण्यासाठी फक्त शस्त्रेच नाही, तर त्यांच्या विचारसरणीची ही प्रतिके नष्ट करणे, हा पोलिसांच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता.
संबंधित लेख:
