सामाजिक न्यायगाथा

समता, समरसता व सेवा: महाराष्ट्रातील महामानवांच्या स्मृतींना मानवंदना

महाराष्ट्राची भूमी ही केवळ संतांचीच नाही, तर सामाजिक क्रांतीच्या अग्रदूतांची कर्मभूमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यासारख्या महामानवांनी मांडलेला समता आणि समरसतेचा विचार हा राज्याच्या प्रगतीचा मूलाधार राहिला आहे. याच विचारांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने २०२६-२७ हे सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून या महापुरुषांच्या विचारांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाची जोड देऊन महाराष्ट्राला एका नव्या दिशेने नेण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे (महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी) पूर्ण होत आहेत. या द्विशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष समिती स्थापन करून, विविध सामाजिक उपक्रमांसाठी भरीव निधीची तरतूद करणार आहे. महात्मा फुले यांनी ज्या मानवी मूल्यांचा पुरस्कार केला, ती मूल्ये आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वर्ष ऊर्जा देणारे ठरेल. त्याचप्रमाणे, स्वच्छतेचा आणि कर्मयोगाचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांचेही हे १५० वे जयंती वर्ष आहे. या निमित्ताने गाडगेबाबांच्या विचारांतील ‘ग्राम समृद्धी’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य सरकारने संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत ७५ गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान ही ठिकाणे एकत्र जोडून एक भव्य तीर्थक्षेत्र सर्किट विकसित केले जाणार आहे. यासाठी अमरावतीतील ऋणमोचन तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वितरणही करण्यात आले आहे.

या समता पर्वाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा म्हणजे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष. २० मार्च २०२६ रोजी महाडच्या भूमीत उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघर्षाला अभिवादन केले. चवदार तळ्याचा लढा हा फक्त पाण्यासाठी नव्हता. तो लढा आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी होता. या लढ्याचे सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चवदार तळे परिसरातील जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारने विशेष आराखडा तयार केला आहे. दरवर्षी २० मार्च रोजी या स्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचा निर्णयही घेतला आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका प्रत्यक्ष कृतीत उतरवत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील अत्याचारग्रस्त कुटुंबातील वारसांना थेट शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे वितरित करून त्यांना सन्मानाने जगण्याचा आधार दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष

महात्मा फुले यांची द्विशताब्दी, संत गाडगेबाबांची १५० वी जयंती आणि चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्र सरकार सामाजिक समतेचा नवा अध्याय लिहित आहे. पायाभूत सोयीसुविधा, तीर्थक्षेत्र विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तळागाळातील माणसाचे जीवन समृद्ध करणे, हाच या सामाजिक समता व समरसता वर्षाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे महामानवांच्या विचारातील प्रगत आणि समतावादी महाराष्ट्र आकारास येत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *