भारताच्या सांस्कृतिक वैभवाला, सामाजिक न्यायाच्या परंपरेला आणि महाराष्ट्राच्या महान व्यक्तींच्या विचारांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या कार्यात महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला झोकून घेतले आहे. २०१४ नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील महामानवांचे पुतळे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रतिष्ठापित केले. जपानपासून रशियापर्यंत ते मॉरिशसपासून पॅरिसच्या युनेस्को मुख्यालयापर्यंत महाराष्ट्रातील सन्माननीय व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या कृतीमागे फक्त राजकीय आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचा हेतू नव्हता. तर महाराष्ट्रातील सामाजिक वारशाला आणि त्यातील थोर व्यक्तींच्या कार्याला जागतिक सन्मान मिळवून देण्याची त्यांची प्रामाणिक भावना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महामानवांच्या पुतळ्यांची परदेशात उभारणी करणे, हा महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय गौरव असून महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. ही स्मारके फक्त इतिहासाची प्रतिके नाहीत. तर ती महाराष्ट्राची गौरवस्थानं आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जपानच्या कोयासन विद्यापीठात पुतळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महामानवांच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला गेला आहे. त्यांनी स्वतः या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या महान परंपरेला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवा आदर मिळवून दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्टेंबर २०१५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जपानमधील कोयासन विद्यापीठात बसविण्यात आला होता. हा या प्रवासातील पहिला ऐतिहासिक टप्पा होता. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जपानमध्ये उभारणे म्हणजे भारतीय संस्कृती आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे जागतिकीकरण झाल्यासारखे आहे. २०१५ मध्ये पुतळा बसवल्यानंतर जवळपास ८ वर्षानंतर, म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कोयासन विद्यापीठाला भेट देऊन या स्मारकासमोर नतमस्तक झाले. हा क्षण भारतीयांसाठी तसेच महाराष्ट्रासाठीही अत्यंत अभिमानाचा ठरला.

रशियाच्या लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे तैलचित्र
या गौरवाशाली प्रवासातील दुसरा टप्पा म्हणजे सप्टेंबर २०२२ मध्ये रशियाच्या मॉस्को शहरातील सरकारी लायब्ररीमध्ये बसवण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. वंचित, श्रमिक, पीडित आणि शोषितांना आवाज देणारे अण्णाभाऊ साठे हे मराठी समाजजीवनातील एक अनोखे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे रशियाशी असलेल्या संबंधामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. पुतळ्यासह त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा क्षण महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाचा क्षण असल्याचे नमूद केले होते. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यिक वारशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला हा सन्मान महाराष्ट्रातील श्रमिक जनतेचा, मराठी अस्मितेचा आणि लोकशाहीरांच्या लढ्याचा जागतिक गौरव ठरला आहे.

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जागतिक गौरवही या प्रवासात झाल्याचे दिसून येते. एप्रिल २०२३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या उपस्थितीत मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते. हिंदवी स्वराज्याचे प्रणेते आणि लोककल्याणाचे आदर्श स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती यांना जगभरातून मिळणारा हा सन्मान भारतीय इतिहासाच्या उंचीचे दर्शन घडवणारा ठरला. हा महाराष्ट्र आणि देशासाठी गौरवाचा क्षण होता.

युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
महाराष्ट्राचा गौरव करणारा आणखी एक ऐतिहासिक क्षण २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पॅरिस येथे दिसून आला. २६ नोव्हेंबर – संविधान दिनाच्या दिवशी युनेस्कोच्या मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. जगातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे भव्य स्मारक उभे राहिले. मानवाधिकार, समता, सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या तत्त्वांचे जागतिक पुरस्कर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ओळख नव्याने अधोरेखित झाली. महाराष्ट्रातील एका थोर सुपुत्राचा सन्मान अशा जागतिक मंचावर होणे म्हणजे भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना मिळालेली मोठी मान्यता आहे.

या उपक्रमांमधून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक वारशाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुषांच्या पुतळ्यांद्वारे परदेशात महाराष्ट्राच्या मूल्यांची, परंपरांची आणि विचारांची प्रतिष्ठा वाढवली. या उपक्रमातून महाराष्ट्रातील महान व्यक्तींच्या कार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा जागतिक पातळीवर सन्मान करण्याचे कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
संबंधित लेख:
