राज्यातील गावांच्या विकासाच्या प्रवासाला नवे वळण देण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गावांचा कायापालट करण्यासाठी, टेक्नॉलॉजी आणि स्थानिकांच्या सहभागाची सांगड घालून देवेंद्र फडणवीस सरकारने पहिल्या टप्प्यात ५ जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प’ (महाराष्ट्र स्मार्ट व्हिलेज) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गावे आणि शहरांमधील दरी कमी करून तिथे पायाभूत सुविधा, डिजिटल संपर्क, ई-शासन, शिक्षण, आरोग्य आणि स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान, साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे सर्वांगीण आणि तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गावांमध्ये ग्रामीण डिजिटल विकासांतर्गत आधुनिक सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा, ई-शासन सेवा, शिक्षण-आरोग्याची गुणवत्ता आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान पोहोचवून गावांचा विकास शहरांच्या तोडीस तोड करण्याचा त्यांचा दृष्टीकोन या प्रकल्पातून प्रत्यक्षात उतरू लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील मौजे सातनवरी येथे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या पहिल्या सातनवरी स्मार्ट व्हिलेज मॉडेलच्या यशस्वी अनुभवाच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांमध्ये या प्रकल्पांतर्गत विकास करण्याची घोषणा केली. हा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या उन्नतीबरोबरच तिथल्या लोकांना डिजिटली या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ५ जिल्ह्यातील ७५ गावे होणार इंटेलिजेंट
राज्य सरकारच्या पुढाकाराने नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ७५ गावे प्रथम टप्प्यात निवडण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील १० गावे, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावे, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील ११ गावे, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील १० गावे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील २१ गावे असणार आहेत. सर्वप्रथम या गावांमध्ये या योजनेचा विस्तार केला जाणार आहे. यातून ग्रामीण भागात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वाय-फाय हॉटस्पॉट्स, डिजिटल शिक्षण-सुविधा, ई-आरोग्य, स्मार्ट शेतीसाठी सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विविध सरकारी विभागांच्या ऑनलाईन सेवा अशा तंत्रज्ञानावर आधारित विविध सुविधांची टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. राज्य सरकार या प्रकल्पाचा भांडवली खर्च उचलणार आहे. त्यामुळे या गावांच्या विकासाच्या वाटचालीला गती मिळणार आहे.

सातनवरी भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजेंट गाव!
भारतनेट योजनेच्या माध्यमातून नागपूरमधील सातनवरी गावात ऑप्टिकल फायबर पोहोचविण्यात आली. याच ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी व्हॉईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस (VoICE) कंपनीने ‘स्मार्ट अॅण्ड इंटेलिजेंट व्हिलेज’ हे मॉडेल विकसित केले. या कंपनीने देशातील २४ कंपन्यांना एकत्र आणून सातनवरी येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केला. सातनवरी गावात स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शेतीत सेन्सरच्या मदतीने पाणी, खत आणि फवारणीचा अचूक वापर करून उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देऊन शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सेन्सर बसविण्यात आले. गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. सौरऊर्जेच्या वापरामुळे विजेवरील खर्च कमी केला. स्मार्ट शाळांमुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील शिक्षण पद्धती मिळू लागली. तसेच आवश्यक आरोग्य सुविधाही तंत्रज्ञानाच्या मदतीने गावातच उपलब्ध होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात डिजिटल पायाभूत सुविधांची अखंडता टिकवण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) या संस्थांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांना सहकार्याची संधी देऊन प्रकल्प अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या सर्व प्रयत्नांतून ग्रामीण भागात फक्त तंत्रज्ञान पोहोचवणे, एवढ्यापुरते मर्यादित न राहता या गावांना आधुनिक, सक्षम, सुरक्षित, रोजगारनिर्मितीच्या संधींनी परिपूर्ण आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. त्यामुळे ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प’ हा महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा सरकारला विश्वास आहे.

संबंधित लेख:
