व्यक्तिमत्त्व | लिडरशिप

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवा विक्रम!

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपली कार्यकुशलता आणि प्रशासनावरील मजबूत पकड सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. १५ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ २,४३३ दिवस म्हणजे सुमारे ६ वर्षे ७ महिने इतका झाला आहे. या बाबतीत त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मागे टाकले आहे. शरद पवार यांचा मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ २,४१२ दिवसांचा होता.

महाराष्ट्र सर्वाधिक काळ मुख्यमंत्री

दुसरा कालावधी होता इतक्या दिवसांचा?

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर वसंतराव नाईक हे ४,०९६ दिवसांच्या कार्यकाळासह पहिल्या आणि विलासराव देशमुख २,६८६ दिवसांच्या कार्यकाळासह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी आता तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अद्याप सुरू असल्याने हा विक्रम दररोज वाढतच जाणार आहे. या राजकीय प्रवासाची पार्श्वभूमी पाहिली तर शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र त्यांना एकदाही आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण पाच वर्षांचा होता. दुसरा कार्यकाळ अवघ्या ६ दिवसांचा होता, तर सध्याचा तिसरा कार्यकाळ सुरू असून १५ जुलै २०२६ पर्यंत त्याला ५८८ दिवस पूर्ण झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा बूथ स्तरावरील सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी राहिला आहे.

सामान्य कार्यकर्ता ते यशस्वी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये २२ जुलै १९७० रोजी जन्मलेल्या देवेंद्र फडणवीस यांना कुटुंबातूनच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले. वडिलांकडून लाभलेला राजकीय वारसा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मिळालेली शिकवण यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा पाया भक्कम रचला गेला. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. १९९२ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात पाऊल ठेवले. १९९२ ते २००१ या कालावधीत नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. १९९९ मध्ये त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात शिरकाव केला.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये थेट बूथ स्तरावर कार्यकर्ता म्हणून काम करण्यापासून ते महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी बांधून राहिलेली नाळ, अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय पकड आणि दूरदृष्टी यांच्या बळावर त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याच्या या विक्रमाने महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे स्थान अधिकच भक्कम केले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती देखील करतोय.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *