महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणात आणि समाजकारणात अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी आणि संयमी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. नगरसेवकपदापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत कसा पोहोचला, यामागे त्यांचे संघटनकौशल्य, प्रशासनावरील मजबूत पकड आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा कारणीभूत ठरली आहे. विधिमंडळातील अभ्यासू भाषणे, विरोधी पक्षातील प्रभावी भूमिका ते थेट राज्याचा गाडा हाकताना त्यांनी आखलेल्या धोरणात्मक योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपली वेगळी छाप पाडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या प्रवासाचा आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘अजिंक्य योद्धा’ या पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात नुकतेच झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत याचे प्रकाशन झाले. पुस्तकाचे मुख्य कथानक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नितीन गडकरी यांनी बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणवीस हे शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार आणि कुशाग्र होते. लॉ कॉलेजमधून सुवर्णपदकासह पदवी मिळवतानाच त्यांच्यातील वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेतील कौशल्याची चुणूक दिसून आली होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत आपल्या विचारसरणीची आणि संभाषणाची चुणूक दाखवली. विद्यार्थी चळवळीत आणि विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत त्यांच्यातील संघटनकौशल्य आणि राजकीय पकड स्पष्ट झाली. वक्तृत्व, अभ्यासूपणा आणि नेतृत्वगुण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सुरुवातीपासूनच मुख्य पैलू राहिले आहेत.
नगरसेवक ते यशस्वी मुख्यमंत्री
त्यांचा राजकीय प्रवास हा एका रात्रीत झालेला नाही, त्यांनी संघटना आणि तळागाळातील कामातून स्वतःला सिद्ध केले आहे. नगरसेवक पदापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या यशस्वी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासात विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावताना, त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न मांडून सभागृह गाजवले. मराठवाडा आणि विदर्भाच्या मागासलेपणाचा प्रश्न असो किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणे, विषयाचा सखोल अभ्यास करून तो ठोसपणे सभागृहात मांडण्याची त्यांची हातोटी सर्वमान्य ठरली. प्रतिकूल परिस्थिती असो वा सत्तेत मिळालेली विविध पदे, त्यांनी अत्यंत संयमाने, निष्ठेने आणि राजकीय कौशल्याने परिस्थिती हाताळली. सहकाऱ्यांना बरोबर घेऊन चालणे आणि त्याच वेळी प्रशासनाच्या बाबतीत कठोर भूमिका घेणे ही त्यांच्या कार्यशैलीची खासियत राहिली आहे.
सुशासन आणि पायाभूत सुविधांचा विकास
एक प्रशासक आणि नेता म्हणून त्यांनी महाराष्ट्राला एका समृद्ध आणि संपन्न राज्याच्या दिशेने नेण्यासाठी मोठे योगदान दिले. समृद्धी महामार्ग, विदर्भ-मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, नक्षलग्रस्त गडचिरोलीत आणलेली साडेसात लाख कोटींची गुंतवणूक, लाडकी बहीण योजना आणि शहरांमधील मेट्रो व पायाभूत सुविधांचा विकास या सर्व उपक्रमांतून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. राजकीय कौशल्यासोबतच सामाजिक बांधीलकी जपत, आपल्या वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारांच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन त्यांनी नागपुरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्यात मोठी भूमिका बजावली. राजकीय यश मिळूनही नम्रता राखणे, प्रतिकूल प्रसंगात संयम न गमावणे आणि पक्षनिष्ठेशी तडजोड न करणे या गुणांमुळे देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरते.
सध्याचे राजकारण आणि राजकीय घराणेशाही सर्वांना माहितीच आहे. आजच्या राजकारणातील आई-वडील किंवा नातेवाईक हे आपल्या मुलांसाठी तिकीटाची मागणी करताना आपण पोहत आहोत. पण देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून तिकिट देण्याबाबत विचारले असता, त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी याबाबतचा अंतिम निर्णय देवेंद्रच घेईल, असे सांगितले. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे वडील हे राजकारणात होते. पण त्यांनी कधीही आपल्या मुलासाठी तिकीट मागितले नाही. त्याच देवेंद्र फडणवीस यांनी आज राजकीय क्षेत्रातून राज्यातील महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे आकलन अजिंक्य योद्धा या पुस्तकातून होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या घराण्याचा इतिहास, त्यांच्या कुटुंबाची राजकीय वाटचाल, सक्रीय राजकारणातील प्रवेश, नगरसेवक, महापौर ते आमदारपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतची झेप या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे.
संबंधित लेख:
