लिडरशिप | जनगाथा | व्यक्तिमत्त्व

गतिमान महाराष्ट्र, विकसित भारत: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा पंतप्रधानांकडून गौरव

महाराष्ट्र हे काही सर्वसाधारण राज्य नाही, तर ते पराक्रम, नैतिकता, भक्ती आणि प्रगतीचा एक अद्भुत संगम आहे. विशेषकरून या राज्याने आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात घेतलेली झेप ही विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला बळ देणारी आहे. उद्योगांपासून तंत्रज्ञानापर्यंत आणि वित्त क्षेत्रापासून ते उत्पादनापर्यंत महाराष्ट्र आजही गुंतवणुकीसाठी जागतिक स्तरावर पहिली पसंती ठरत आहे, महाराष्ट्राच्या या प्रगतीत देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा राहिला असून त्यांच्या या कर्तबगारीमुळे महाराष्ट्र आज देशातील प्रगत राज्य म्हणून नावारूपास येत आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काढले आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त (१ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा गौरव करणारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करणारे पत्र पाठवले आहे. पंतप्रधानांनी पाठवलेल्या पत्रात राज्याच्या प्रगतीचा आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा गौरव केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केलेला २०४७ पर्यंतचा विकासाचा आराखडा आणि त्याचे टप्पे हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या नियोजित प्रगतीचे कौतुक केले. गुंतवणूक, टेक्नॉलॉजी, आर्थिक सत्ताकेंद्र ते विविध उत्पादनासाठी महाराष्ट्र जागतिक स्तरावर लोकांच्या पसंतीस उतरत आहे; आणि याचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान प्रशासनाला दिले.

देशात नरेंद्र सरकार अन् महाराष्ट्रात देवेंद्र सरकार!

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे महाराष्ट्राला रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांसाठी ऐतिहासिक निधी प्राप्त झाला आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार, नवी मुंबई विमानतळ आणि वाढवण बंदर यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले काम असो किंवा मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम. हे सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे ठरले आहेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात झालेला कायापालट आणि तिथे येत असलेली हजारो कोटींची गुंतवणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर धोरणांचे यश आहे, अशा भावना पंतप्रधानांनी पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

संकल्प आणि सिद्धी

सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेच्या बाबतीतही देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाठपुराव्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठा साम्राज्यातील १२ किल्ल्यांचा युनेस्को वारसा यादीत समावेश झाला. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे प्रयत्न मराठी माणूस कधीच विसरणार नाही. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री ज्या पद्धतीने महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत, त्याचे प्रतिबिंब पंतप्रधानांच्या या पत्रातून उमटले आहे. सामाजिक समरसता आणि आर्थिक प्रगतीचा समतोल साधत आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे योगदान अतुलनीय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.

मोदींकडून देवेंद्र फडणवीस यांचे पत्राद्वारे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या फक्त शुभेच्छा नाहीत. तर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच्या, कामाच्या पद्धतीला दिलेली दाद आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयातून आधुनिक आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या निर्मितीचा एक व्यापक रोडमॅप आपल्यासमोर उभा राहतो. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत घेतलेले धाडसी निर्णय, राबवलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि सामाजिक समरसतेचा वारसा यामुळे महाराष्ट्र आज देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन बनला आहे. असे म्हटले जाते की, महाराष्ट्राचा सह्याद्री नेहमीच्या भारताच्या मदतीला धावून जातो, तसेच विकसित महाराष्ट्र हा येणाऱ्या काळात समृद्ध भारताचा आधारस्तंभ ठरेल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *