लिडरशिप

वारसा जनसेवेचा: गंगाधरराव फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय साधर्म्य

महाराष्ट्राच्या राजकारणात नागपूरच्या फडणवीस कुटुंबाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जडणघडणीत त्यांचे वडील गंगाधरराव काशीराव फडणवीस यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा वाटा आहे. या पिता-पुत्रांच्या राजकीय प्रवासाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यांच्यातील वैचारिक आणि कामाच्या पद्धतीत कमालीचे साम्य दिसून येते. फडणवीस पिता – पुत्र या दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून झाली आहे. गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते, तर देवेंद्र फडणवीस यांनीही बालपणापासूनच संघाच्या शाखेत शिस्तीचे धडे गिरवले आहेत. राष्ट्रवाद आणि सामाजिक बांधिलकी हे मूल्य या दोघांच्याही राजकारणाचा पाया राहिले आहे. सत्तेपेक्षा विचारांना महत्त्व देण्याची वृत्ती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांकडूनच वारशाने घेतल्याचे दिसून येते. या दोघांचाही राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा नागपूर महापालिकेतून झाला आहे; हे या दोघांमधील आणखी एक महत्त्वाचे साम्य आहे.

गंगाधरराव फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक आणि उपमहापौर (१४ फेब्रुवारी १९७५ ते ७ मार्च १९७६) म्हणून काम केले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरचे नगरसेवक आणि सर्वात तरुण महापौर म्हणून मार्च १९९७ ते फेब्रुवारी १९९९ या कार्यकाळात आपली छाप पाडली. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरू झालेला हा प्रवास दोघांनाही विधीमंडळापर्यंत घेऊन गेला आहे. गंगाधरराव फडणवीस दोन टर्म (२० जुलै १९७८ ते १७ जुलै १९८४ आणि २३ जुलै १९८४ ते ११ जानेवारी १९८८) विधान परिषदेचे सदस्य होते, तर देवेंद्र फडणवीस यांनी सलग सहाव्यांदा (१९९९ ते २०२४) विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून राज्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले.

झोपडपट्टीवासियांच्या न्याय हक्कांसाठी पिता-पुत्रांचा लढा

स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरू झालेली दोघांची राजकीय वाटचाल ही त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली. गंगाधरराव फडणवीस हे तर्कशास्त्र आणि सामाजिक विषयांचे गाढे अभ्यासक होते. त्यांची हीच ‘स्कॉलर’ वृत्ती देवेंद्र फडणवीस यांच्यातही प्रकर्षाने जाणवते. अर्थसंकल्पाचे विश्लेषण असो किंवा कायदेशीर गुंतागुंत सोडवणे. देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही गंगाधररावांच्या बौद्धिक वारशाची आठवण करून देतात. देवेंद्र फडणवीस यांनी १६ डिसेंबर १९९९ रोजी विरोधी पक्ष नेत्याने मांडलेल्या कापसाच्या भावासंदर्भातील ठरावावर विधिमंडळात पहिल्यांदा भाषण केले. हे भाषण मुद्देसूद आणि अभ्यासू होते. गंगाधरराव फडणवीस यांनी झोपडपट्टी सुधार आंदोलनात पुढाकार घेत झोपडपट्टीवासियांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीधारकांच्या मालकी हक्क पट्टे वाटपात विशेष योगदान दिले. यासाठी त्यांनी रस्त्यांवरील संघर्षाबरोबर विधानसभेत नियमांना धरून कायद्याचा आधार घेत नागपूरमधील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट्टे मिळवून दिले.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि पक्षाप्रती असलेली कमालीची निष्ठा या बाबतीत हे पिता-पुत्र सारखेच आहेत. आणीबाणीच्या काळात गंगाधररावांनी भोगलेला तुरुंगवास त्यांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाची साक्ष देतो. त्याचप्रमाणे, कोणत्याही कठीण प्रसंगात पक्षाची बाजू समर्थपणे मांडण्याचे कौशल्य देवेंद्र फडणवीस यांनी आत्मसात केले आहे. थोडक्यात सांगायचे तर, गंगाधरराव फडणवीस यांनी लावलेल्या संस्कारांच्या रोपट्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एका महावृक्षात रूपांतर झाले आहे. संस्कार, अभ्यास आणि निष्ठा, ही या पिता-पुत्रांमध्ये समान दुवा ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *