नागपूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनात देशासमोर एक नवा वस्तुपाठ ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भांडेवाडी येथे देशातील पहिल्या ‘एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्रा’ची उभारणी करण्यात येत आहे. हा प्रकल्प नागपूर महानगरपालिका आणि केवा सुसबडे (KEVA SusBDe) या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या माध्यमातून साकारला जात आहे. खाजगी गुंतवणूक भागीदारीतून असा पहिला प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाला कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही. उलट शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनावरील महापालिकेचा संपूर्ण खर्च वाचणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहर संपूर्ण भारतात घनकचरा व्यवस्थापन तसेच कचरामुक्त नागपूर शहर म्हणून एक नवा आदर्श निर्माण करेल.
एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्र, हा पथदर्शी प्रकल्प एकूण तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तो पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहरातील सुमारे १२०० मेट्रिक टन कचऱ्यावर आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी शहरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जाणार आहे. या प्रक्रियेतून प्रत्येक दिवसाला तब्बल २८ टन बायोगॅसची निर्मिती होणार आहे. हा उत्पादित बायोगॅस नागपूर शहरातील १९८ बसेससाठी ‘सीएनजी ग्रीन एनर्जी’ म्हणून उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्यामुळे नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक होणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. उलट शहरात निर्माण होणाऱ्या १३०० मेट्रिक टन कचरा व्यवस्थापनावरील खर्च वाचणार आहे. बायोगॅस सोडून या प्रक्रियेतून उच्च दर्जाचे कंपोस्ट खत आणि सुक्या कचऱ्यापासून पॉवर प्लेट्स (ऊर्जा विटा)ची निर्मिती केली जाणार आहे. ज्याचा उपयोग महाजेनकोसाठी आवश्यक असलेले ऊर्जा स्त्रोत म्हणून केला जाणार आहे.

या पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ३० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकल्पातून तयार होणाऱ्या गॅसच्या विक्रीतून नागपूर महानगरपालिकेला दरवर्षी १५ लाख रुपयांची रॉयल्टी देखील मिळणार आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता या प्रकल्पात घेण्यात आली आहे. कचऱ्यापासून बायोगॅस, उत्तम दर्जाचे खत आणि पॉवर प्लेट्स निर्माण करणारा हा भारतातील पहिलाच वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर शहराला लाभलेला हा प्रकल्प केवळ कचरामुक्तीचे स्वप्न साकार करणार नाही, तर देशातील इतर शहरांसाठी शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आणि हरित ऊर्जेचा एक आदर्श मार्ग दाखवून देणारा ठरेल.
संबंधित लेख:
