महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आयटी क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या चाकण आणि हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण – हिंजवडीच्या एकात्मिक विकासासाठी १८२६ कोटी रुपयांच्या एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मंजुरी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (दि.२८ सप्टेंबर) चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चाकणसाठी १४०० कोटी आणि हिंजवडीसाठी ४२६ कोटी रुपयांच्या पायाभूत विकास आराखड्याला मंजुरी दिली. या प्रकल्पाचे काम डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहे, तर पुढील पावसाळ्यापूर्वी या भागातील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प देखील सोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चाकण आणि हिंजवडीतील पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते सुधारणा आणि विस्तार वेगाने पूर्ण होणार असून, परिसरातील गंभीर वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
पाण्याचा निचरा आणि रस्ते सुधारणा
चाकण औद्योगिक वसाहतीत पावसाळ्यात साचणारे पाणी आणि विस्कळीत होणारी वाहतूक यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलनिचरा आणि रस्ते सुधारण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. यासाठी सर्वप्रथम चाकण परिसरातील सुमारे ७८ किमी लांबीच्या नैसर्गिक नाल्यांवरील ७० ते ८० टक्के अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. जून २०२७ पर्यंत या नाल्याच्या आड येणारे उर्वरित अडथळे दूर करून पाणी निचऱ्याची व्यवस्था पूर्ण केली जाणार आहे. तसेच या भागात ३८ किमी लांबीची रस्त्यालगत पावसाळी गटार व्यवस्था देखील उभारली जाणार आहे.

विविध मार्गांवर ५०० अतिरिक्त सरकारी बसेस सुरू करणार
चाकण औद्योगिक परिसरातील ४९८ किमी रस्त्यांच्या जाळ्याचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाद्वारे वाहतुकीची घनता, औद्योगिक महत्त्व, मालवाहतुकीची वर्दळ, रस्त्यांची स्थिती, पाणी साचण्याची समस्या, सुरक्षितता आणि जोडणी या निकषांवर रस्त्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भूसंपादनाची गरज न पडणाऱ्या ७५ किमी रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, सुरक्षा व्यवस्था आणि सर्व्हिस लाईन्ससाठी स्वतंत्र जागेची तरतूद केली जाणार आहे. तसेच इथली खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी विविध मार्गांवर सुमारे ५०० अतिरिक्त सरकारी बसेस सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
एआयच्या मदतीने वाहतूक कोंडीवर स्मार्ट उपाय
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून चाकण व हिंजवडीत ये-जा करणाऱ्या हजारो कामगारांच्या प्रवासाची कोंडी दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या भागातील महत्त्वाच्या ६ चौकांची शास्त्रीय पद्धतीने पुनर्रचना केली जाणार आहे. वाहतूक यंत्रणा नियंत्रणात ठेवण्याबरोबरच, वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल, ITMS सिस्टीम, कॅमेरे, रडार आणि व्हेईकल नंबर प्लेट रेकग्निशन सिस्टीमसह मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. त्याबरोबर इथली वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान चाकणमध्ये तैनात केले जाणार आहेत.
नागरी सुविधा, वीज आणि घनकचरा व्यवस्थापन
चाकण परिसरातील १४ गावे व २ नगर परिषदांसाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्रीकृत कचरा प्रक्रिया केंद्र ८ ते १० महिन्यांत सुरू केले जाणार आहे. तर चाकणमधील पाणीपुरवठा योजना २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. इथली पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवली जाणार आहे. तर वीज तुटवडा दूर करण्यासाठी १०० मेगावॅट क्षमतेच्या उपकेंद्राचे काम डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहे. रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांसाठी एमआयडीसीने ५ ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली. तसेच खाजगी संस्थांच्या मदतीने रस्त्यांवरील दुभाजक, बसथांबे आणि सार्वजनिक शौचालयांची उभारणी व सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत.
हिंजवडीसाठी ४२६ कोटींचा स्वतंत्र विकास प्लॅन
आयटी हब असलेल्या हिंजवडीतील वाहतूक आणि मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४२६ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गतच हिंजवडीतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ६ एकर जागा उपलब्ध करून दिली. तर वाहतूक व्यवस्थापनासाठी १०० सुरक्षा जवान तैनात केले जाणार आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून या भागातून नियमित कचरा संकलन सुरू केले जाणार आहे.
चाकण आणि हिंजवडीचा विकास हा एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि ठोस निर्णयामुळे चाकण आणि हिंजवडीतील औद्योगिक व आयटी क्षेत्रातील समस्या लवकरच सुटणार असून, या परिसराच्या सर्वांगीण विकासाला एक नवी आणि गतीमान दिशा मिळणार आहे.
संबंधित लेख:
