पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार लक्षात घेता नव्याने भूमिपूजन करण्यात आलेले तीन उन्नत महामार्ग शहराच्या दळणवळण व्यवस्थेला एक नवी दिशा देणारे ठरणार आहेत. पुणे-शिरुर महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर-यवत उन्नत महामार्ग या तीन प्रमुख मार्गांवर उभारण्यात येणाऱ्या या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे फक्त शहरांतर्गत वाहतूक नाही, तर या परिसरातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींमधील वाहतूक समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
बीओटीतून सरकारच्या तिजोरीत निधी जमा होणार
या पुणे उन्नत महामार्ग प्रकल्पांमध्ये प्रथमच बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) या नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांमधून फक्त टोल फी नाही सरकारला अपफ्रंट (Upfront) निधी देखील मिळणार आहे. या नवीन मॉडेलनुसार पहिल्या प्रकल्पातून ५०० कोटी, दुसऱ्या प्रकल्पातून ३०० कोटी, तर तिसऱ्या प्रकल्पातून १५० कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत. हा निधी सरकारला भूसंपादनासाठी वापरता येणार आहे. या तीनही प्रकल्पांची रचना आधुनिक गरजांचा विचार करून करण्यात आली आहे. इन्फ्रा मॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महामार्गांचे भूमिपूजन झाले.

भविष्यातील मेट्रोच्या खर्चात ४० टक्के बचत
पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत या मार्गांवर एलिव्हेटेड रोड आणि त्यावर मेट्रो अशा दुहेरी (डबल डेकर) मॉडेलचा वापर केल्यामुळे भविष्यातील मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ४० टक्के बचत होणार आहे. तसेच उरुळी कांचन आणि पुणे-शिरूर मार्गावरील सुरुवातीच्या भागात भविष्यातील मेट्रोसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या महामार्गांमुळे वेगवान वाहनांसाठी उन्नत मार्ग आणि स्थानिक वाहतुकीसाठी जमिनीला समांतर बहुपदरी रस्ते उपलब्ध होणार आहेत. यामुळे द्रुतगती आणि स्थानिक वाहनांची सरमिसळ थांबून प्रवासाचा किमान ५० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. वेळेच्या बचतीसोबतच इंधनाची बचत होऊन शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग हा सुमारे ५३.२ किमी लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत २६ किमी उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि जमिनीवरील ४ पदरी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार असल्याने वाहतूक कोंडीत मोठी घट होणार आहे. तसेच, चाकण औद्योगिक परिसर, नाशिक फाटा, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडल्यामुळे उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. परिणामी, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे.
हडपसर-यवत उन्नत महामार्ग
हडपसर-यवत उन्नत महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किमी आहे. त्यामध्ये सुमारे २५ किमी उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि जमिनीवरील ६ पदरी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच, हा मार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोडशी जोडला जाणार आहे. त्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
पुणे-शिरूर महामार्ग
पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३एफ वरील सुमारे ५४ किमी मार्गाचा अत्याधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात ३१ किमीमध्ये ६ पदरी उन्नत महामार्ग, स्थानिक वाहतुकीसाठी समांतर ४ पदरी रस्ता आणि सुरुवातीच्या ७ किमी भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठी तरतूद करण्यात आली आहे. पुणे-शिरूर प्रवासाचा कालावधी ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे तिन्ही मार्ग अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जोडले जात आहेत. चाकण औद्योगिक परिसर, नाशिक फाटा, पुणे रिंगरोड, राष्ट्रीय महामार्ग ६५ तसेच पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी या मार्गांची थेट जोडणी मिळणार आहे. यामुळे अभियांत्रिकी, स्टार्टअप्स आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळून शहराच्या आर्थिक विकासाचा वेग वाढेल. जलद, सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारे हे उन्नत महामार्ग पुण्याच्या भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण करत शहराच्या आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणतील.
संबंधित लेख:
