महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा एक भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी झोया मरीन सर्व्हिसेस या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रासाठी हा प्रकल्प एक मोठी संधी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक (हरित जलवाहतूक) जलवाहतुकीचे नवे दालन खुले होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प राज्यातील आगामी ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाला बळ देणारा ठरणार आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण भागात नियोजित असलेल्या वॉटर मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक आणि हरित तंत्रज्ञानावरील इलेक्ट्रिक बोटींची निर्मिती आता थेट सिंधुदुर्गातच होणार आहे. यामुळे प्रकल्पांचा खर्च कमी होऊन राज्याला जलवाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरता लाभणार आहे.
वॉटर मेट्रोसाठी २०७ इलेक्ट्रिक बोटींची निर्मिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, तालवणे येथील इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील आणि देशातील आगामी वॉटर मेट्रो प्रकल्पांना बळ देणारा ठरणार आहे. वॉटर मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणपूरक दळणवळणाला गती देणारा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे २२ एकर क्षेत्रावर आधुनिक जहाजबांधणी कारखाना उभारण्यात येणार आहे. या कारखान्यातून महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हरित नौकांची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प सुमारे ६,०६७ कोटी रुपयांच्या भव्य वॉटर मेट्रो प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणार आहे. वॉटर मेट्रोसाठी लागणाऱ्या तब्बल २०७ इलेक्ट्रिक बोटी या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे.

इतर देशांवरील अवलंबित्व संपुष्टात येणार
सध्याच्या काळात रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक हा एक उत्तम आणि शाश्वत पर्याय म्हणून समोर येत आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीच्या भागात वॉटर मेट्रो प्रकल्पांचे नियोजन वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत, या जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम बोटींची आवश्यकता भासणार आहे. सिंधुदुर्ग येथील प्रकल्पामुळे या वॉटर मेट्रो प्रकल्पांसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिक बोटींची निर्मिती थेट राज्यातच उपलब्ध होईल. ज्यामुळे इतर देशांवर किंवा राज्यांवर असणारे अवलंबित्व पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. स्थानिक पातळीवर बोटींची निर्मिती झाल्यामुळे वॉटर मेट्रो प्रकल्पांचा उत्पादन खर्च आणि देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल, तसेच बोटींच्या सुट्या भागांची उपलब्धता सहज आणि वेगाने होणे शक्य होईल.
जलवाहतूक प्रणालीला स्वावलंबी बनवणारा प्रकल्प
या स्वदेशी आणि हरित तंत्रज्ञानावर आधारित बोट निर्मितीमुळे वॉटर मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीला प्रचंड गती मिळणार आहे. प्रवाशांसाठी सुरक्षित, आवाजरहित आणि प्रदूषणमुक्त प्रवास देणाऱ्या या इलेक्ट्रिक बोटी वॉटर मेट्रोचे मुख्य आकर्षण ठरतील, ज्यामुळे नागरिक जलवाहतुकीकडे अधिक आकर्षित होतील. एकीकडे वॉटर मेट्रोमुळे किनारपट्टीच्या शहरांमधील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, तर दुसरीकडे सिंधुदुर्गातील हा प्रकल्प त्या मेट्रो व्यवस्थेला लागणाऱ्या वाहनांचा अखंड पुरवठा करणारा मुख्य स्रोत बनेल. १५० कोटी रुपयांचा हा सामंजस्य करार हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि वॉटर मेट्रो सारख्या आधुनिक जलवाहतूक प्रणालीला स्वावलंबी बनवणाऱ्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
संबंधित लेख:
