इन्फ्रा मॅन | पुणे

पुण्याच्या प्रगतीला नवा वेग: एचसीएमटीआर, रिंग रोड आणि शहरात बोगद्यांचे जाळे

पुणे शहरातील आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पुण्याच्या भविष्यातील दीर्घकालीन विकासाचा विचार करता उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुण्यातील अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचे जाळे (पाताळलोक प्रकल्प) हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. पुणे शहराला अधिक कार्यक्षम, वाहतूकसुलभ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात हे प्रकल्प अत्यंत मोलाची भूमिका बजावणार आहेत.

पुणे वाहतूक कोंडी समस्या व उपाय

पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मुंबईत घेतला. या आढाव्यातील माहितीनुसार पुण्यातील वाहतूक कोंडी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी हाय कपॅसिटी मास ट्रान्सिट रूट (एचसीएमटीआर) प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४३.६० किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी उन्नत मार्ग उभारला जाणार असून, तो शहराच्या मध्यवर्ती नागरी भागातून जाणार आहे. सर्व मेट्रो मार्गिकांना एकमेकांशी जोडणाऱ्या या प्रकल्पाचा अपेक्षित बांधकाम खर्च सुमारे ९००० कोटी रुपये आणि भूसंपादनासाठी सुमारे ३००० कोटी रुपये आहे. हा प्रकल्प बोपोडी, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता आणि एअरपोर्ट चौक अशा विविध भागांमध्ये विभागला आहे. याचे काम लगेच सुरू करून ते २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पुण्यातील आगामी पायाभूत सुविधा

यासोबतच, पीएमआरडीए (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) मार्फत राबवण्यात येणारा ८३.१२ किलोमीटर लांबीचा अंतर्गत रिंग रोड प्रकल्प ५ टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. सुमारे २५,१५९.८८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात ४४ गावांचा समावेश असणार आहे. या रिंग रोडचा सोळू, वडगाव शिंदे, लोहगाव, वाघोली, कदमवाक वस्ती, जांभूळवाडी, भूगाव आणि परंदवाडी या भागांना मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाची प्रक्रिया रोख मोबदल्याद्वारे पुढील ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. तसेच, शहरात ‘पाताळलोक’ प्रकल्पांतर्गत भोसरी ते उंदरी नवीन विमानतळ, रामनदी-भूगाव ते राजाराम पूल आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे अशा तीन मुख्य ठिकाणी बोगद्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ संस्थांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *