महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने देशातील तरुणाईला अमली पदार्थांच्या घातक जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ जनजागृती अभियान सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ या संकल्पाला बळ देत, येणाऱ्या ३ ते ४ वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र’च्या माध्यमातून नशामुक्त भारत साकार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
ड्रग फ्री मुंबई अभियान, लोकचळवळ बनवणार
भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. हीच तरुणाई विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आहे. भारत आज विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अशावेळी भारताला थेट युद्धात पराभूत करणे शक्य नाही. त्यामुळे देशाला आतून कमकुवत करण्यासाठी तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचे छुपे षडयंत्र रचले जात आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने हे अभियान एक लोकचळवळ म्हणून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जुलै २०२६ रोजी मुंबईत या अभियानाचा महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला.
पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन!
मुंबईत ‘ड्रग फ्री मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आणि या अभियानाच्या सुरूवातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत करत हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेल्या संदेश पत्रात नमूद केले आहे की, नशा ही समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता, शांतता आणि विकासासमोरील गंभीर समस्या आहे, त्याचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर, आत्मविश्वासावर आणि जीवनाच्या दिशेवर प्रतिकूल परिणाम होतो. अमली पदार्थांचे व्यसन हे तरुणांच्या भविष्याला आणि प्रतिभेला मोठा धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे नशामुक्त समाजाच्या उभारणीसाठी जनजागृतीबरोबरच कुटुंबातील संस्कार, समाजाची सामूहिक जबाबदारी आणि विविध संस्थांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचे या अभियानासाठी अभिनंदन केले.
गनिमी काव्याने ड्रग माफियांचे जाळे उद्ध्वस्त करणार
तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी फक्त पोलीस, कायदा-सुव्यवस्था पुरेशी पडणारी नाही. त्यात सरकारमधील सामाजिक विषयांशी संबंधित विभाग, जसे की, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. अमली पदार्थांचा पुरवठा, उत्पादन आणि तस्करीविरोधात सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे. विशेषकरून शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या प्रेरणेने ड्रग माफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने यात खबरी म्हणून मदत करणे गरजेचे आहे. अशी मदत करणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि भविष्यात अशा सजग नागरिकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.

‘ड्रग फ्री कॅम्पस, ड्रग फ्री स्कूल’
ड्रग फ्री अभियानात शैक्षणिक संस्थांची आणि विद्यार्थ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. शाळा, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी ही मुख्य केंद्र आहेत. येथे ‘ड्रग फ्री कॅम्पस’ (Drug Free Campus) आणि ‘ड्रग फ्री स्कूल’ (Drug Free School) ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची मदत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः ‘से, नो टू ड्रग्स’ (Say, No to Drugs) असा ठाम निर्धार करून कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता अमली पदार्थांना नकार देणे आवश्यक आहे. साधारणपणे, वयाच्या २१ ते २२ वर्षांपर्यंत तरुण व्यसनांपासून दूर राहिले तर ते आयुष्यभर या वाईट सवयींपासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फक्त अमली पदार्थांवर बंदी न घालता, व्यसनाधीन झालेल्या युवकांचे पुनर्वसन करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यावरही देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे भर दिला जात आहे.
स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तरुणाईला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात जोडणे आणि ‘ड्रग फ्री मुंबई’ची शपथ प्रत्यक्ष कृतीत उतरवून एक सुरक्षित व सशक्त समाज घडवणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
संबंधित लेख:
