महाराष्ट्राची थोर वारकरी परंपरा आणि आषाढी वारीचा सोहळा हा अखंड भक्तीचा, सामाजिक सलोख्याचा आणि निस्सीम श्रद्धेचा एक अलौकिक अनुभव आहे. विठुरायाच्या चरणी लीन होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे ‘ग्रामविकासाची वारी, पंढरीच्या दारी’ या संकल्पनेतून व्यापक आणि नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची खरी सेवा या भावनेतून महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वारीच्या मार्गावर आणि पंढरपुरात पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे उभे केले.
मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र
पंढपूरच्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या निवासाची आणि विश्रांतीची योग्य सोय व्हावी यासाठी सरकारकडून जागोजागी ‘मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र’ उभारण्यात आले होते. तर प्रवासात आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी, आरोग्य सेवा, मुख्यमंत्री आरोग्य रथ, बाईक ॲम्बुलन्स आणि थेट वारीच्या मार्गावर सेवा देणारी फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. याचसोबत वारकऱ्यांना अत्यावश्यक वैद्यकीय किटचे वाटप आणि लांबच्या पायी प्रवासात थकलेल्या वारकऱ्यांसाठी चरण सेवेची विशेष सोय करण्यात आली होती.

वारकऱ्यांच्या आरोग्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य
आरोग्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य देत पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे उभारण्यात आली. वारीचा संपूर्ण मार्ग आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी वारी पश्चात स्वच्छता आणि सातत्यपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली गेली. वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचे जार आणि टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. महामार्गांवर दिशानिर्देश फलक, स्वागत कमानी आणि मुख्य पालखी महामार्गांचे मजबुतीकरण करण्यात आले.
सुरक्षित आणि स्वच्छतेची प्रचिती देणारी ‘निर्मल वारी’
रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी पालखी तळांचे विद्युतीकरण करण्यात आले. याशिवाय, आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली होती. मोबाईल चार्जिंग व्हॅन, हिरकणी कक्ष, अभंग संध्या आणि श्लोक फलक यासारख्या विविध उपक्रमांमुळे वारकऱ्यांचा हा भक्तीमय प्रवास अधिक सुलभ आणि आनंदी झाला. सामाजिक सलोखा, स्वच्छता आणि भक्तीचे अप्रतिम दर्शन घडवणारी ही ‘निर्मल वारी’ लाखो वारकऱ्यांना सुलभ दर्शन आणि आनंदाची प्रचीती देणारी ठरली.
दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान
राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता जुलै २०२४ मध्ये महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन केले. त्याचबरोबर आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या जवळपास १४०० दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्यात आले.
संबंधित लेख:
