गडचिरोली | सोलर मॅन

‘सोलर मॅन’ची महाराष्ट्रात सौर क्रांती; गडचिरोलीतील नवेगाव ठरले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’

केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर: मोफत वीज योजने’ अंतर्गत गडचिरोलीतील नवेगाव या गावाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज (आदर्श सौर ग्राम) होण्याचा बहुमान मिळवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री व सोलर मॅन म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांच्या हरित ऊर्जेच्या धोरणाला आणि गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाला या यशाचे श्रेय जाते. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नवेगावाला केंद्राकडून १ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर झाले आहे.

‘सोलर मॅन’चे योगदान आणि राज्याची सौर झेप

महाराष्ट्राला अपारंपरिक व स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक व दूरदर्शी निर्णयामुळे महाराष्ट्र सौर ऊर्जेत देशात अग्रेसर आहे. राज्यातील पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोलर मॅन देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जा प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य दिले. २०३० पर्यंत राज्यातील अक्षय ऊर्जेचा वाटा १३ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे पीएम सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये पोहोचला आहे. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात हजारो मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारले जात आहेत.

नवेगावने असे मिळवले यश

गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या धोरणात्मक पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या गतिमान कारभारामुळे गडचिरोलीतील नवेगावने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सुचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श सौर ग्राम विकसित करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार ५ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमधून गडचिरलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्ह्यातील ५ गावांची निवड केली. त्यात गडचिरोली तालुक्यातील नवेगाव, अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी आणि वडसा तालुक्यातील कुरूड या गावांचा समावेश होता.

१७ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या ६ महिन्यांच्या स्पर्धेच्या कालावधीत नवेगावच्या नागरिकांनी सौर ऊर्जेचा स्वीकार करण्यात आघाडी घेतली. गावातील तब्बल १०५ वीज ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल उभारले. इतर चार गावांच्या तुलनेत नवेगावातून सर्वाधिक अक्षय ऊर्जा क्षमता स्थापित झाल्यामुळे नवेगावची जिल्ह्यातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड झाली. या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांचे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांच्या वीज बिलात मोठी बचत होऊ लागली आहे.

घरगुती प्रकल्पानंतर आता सार्वजनिक संस्थाही सौर ऊर्जेवर चालणार

मॉडेल सोलर व्हिलेज ठरल्याबद्दल नवेगावला मिळणाऱ्या १ कोटी रुपयांच्या निधीतून आता गावातील सार्वजनिक आणि सरकारी इमारतींवर सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. गावातील १७ सरकारी व निमसरकारी इमारतींवर एकूण १०६ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ६३.१२ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. नवेगावात घरगुती प्रकल्पानंतर आता सार्वजनिक संस्थाही सौर ऊर्जेवर चालणार असल्याने इथल्या वीज खर्चात मोठी बचत होणार आहे.

काय आहे ‘पीएम सूर्यघर’ आणि ‘आदर्श सौर ग्राम’ योजना

पीएम सूर्यघर: मोफत वीज योजना ही केंद्र सरकारने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली. घरांच्या छतावर सौर पॅनल बसवून सर्वसामान्य कुटुंबांना स्वतःची वीज निर्माण करण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत / स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना २०२६-२७ पर्यंत राबवली जाणार असून, यासाठी ७५,०२१ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. तर केंद्र सरकारने आदर्श सौर ग्राम (Model Solar Village) योजनेसाठीची मार्गदर्शक तत्त्वे ९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केली आहेत. मार्गदर्शक तत्वानुसार गावकऱ्यांना ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी संपूर्ण देशात प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श सौर ग्राम तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारने ८०० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद केली आहे.

आदर्श सौर ग्राम स्पर्धेचे प्रमुख निकष

  • गावाची लोकसंख्या ५,००० पेक्षा जास्त (विशेष श्रेणीतील राज्यांसाठी २,००० पेक्षा जास्त) असणे आवश्यक.
  • सदर गाव महसूली गाव असणे आवश्यक.
  • जिल्हास्तरीय समितीकडून संभाव्य गावांची नावे जाहीर होणे आवश्यक.
  • ६ महिन्यांत स्थापित केलेल्या अक्षय ऊर्जा क्षमतेचे मूल्यांकन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्राच्या’ स्वप्नाला बळ देणारी नवेगावची ही ऐतिहासिक कामगिरी गडचिरोलीसह संपूर्ण राज्यातील इतर गावांसाठीही स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी एक उत्तम आदर्श ठरली आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *