ऊर्जामंत्री

महाराष्ट्रात ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प; ७९ हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्राला स्वच्छ आणि अखंडित वीजपुरवठा पुरवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या खासगी कंपन्यांसोबत ४२०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात ७९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास ११ हजार रोजगार निर्माण होणार आहे.

अणुऊर्जा प्रकल्पांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला पसंती

अणुऊर्जा निर्मितीला बळ देणारे धोरणात्मक पाऊल देवेंद्र फडणवीस सरकारने उचलले आहे. टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या खासगी कंपन्यांसोबत राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने सामंजस्य करार केले आहेत. जेएसडब्ल्यू एनर्जीचा २८०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबुंदर येथे दोन टप्प्यांत साकारला जाणार आहे. यासाठी ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर टोरेंट पॉवरचा १४०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रत्नागिरी किंवा राज्यातील इतर भागात उभारला जाणार आहे.

महाराष्ट्रात ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्पांसाठी करार

अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत २०,४०० मेगावॅटची भर

केंद्र सरकारच्या ‘शांती'(Sustainable Harnessing and Advancement of Nuclear Energy for Transforming India Act, 2025) कायद्यामुळे अणुऊर्जा क्षेत्र भारतातील खासगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर १९६२ चा जुना ‘अणुऊर्जा कायदा’ आणि २०१० चा ‘अणुकुशल नुकसान नागरी दायित्व कायदा’ रद्द करून या क्षेत्राला नवे कायदेशीर स्वरूप दिले आहे. केंद्र सरकारने या कायद्यांतर्गत २०२७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे ध्येय ठेवले आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करून, सौर व पवन ऊर्जेव्यतिरिक्त अखंडित मिळणारा स्वच्छ वीजपुरवठा मिळवण्यावर भर दिला आहे. सौर आणि पवन ऊर्जेसोबतच राज्याचा मूलभूत वीजभार सांभाळण्यासाठी अणुऊर्जा हा एक सक्षम, प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे येत आहे. या नवीन करारामुळे आणि यापूर्वीच्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या एकूण अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत २०,४०० मेगावॅटची भर पडणार आहे.

ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र आत्मनिर्भर बनणार

अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची क्षमता फक्त अणुऊर्जेसारख्या शाश्वत स्रोताद्वारेच पूर्ण केली जाऊ शकते. हे लक्षात राज्य सरकारने महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला आहे. जेएसडब्ल्यू एनर्जीच्या भिवबुंदर येथील प्रकल्पात ७०० मेगावॅटचे चार संच असणार आहेत. पहिल्या टप्प्यात १४०० मेगावॅटसाठी २२ हजार कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १४०० मेगावॅटसाठी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पातून ८ ते १० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर, टोरेंट पॉवरचा २ x ७०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प १७०० लोकांना रोजगार मिळवून देणारा आहे.

महाराष्ट्रात यापूर्वी बारसू येथे ६००० मेगावॅट आणि ७,६४० मेगावॅट क्षमतेच्या दोन प्रकल्पांवर काम सुरू आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे एनटीपीसी लिमिटेडचा ४००० ते ७२०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, थोरियम आधारित चाचण्या आणि अमेरिकन कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी दाखवलेली उत्सुकता यामुळे राज्यातील ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *