महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतीला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसला आहे. ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसाने झाले. पीक ऐन हातात आलेले असताना या संकटामुळे शेतकऱ्यांंना मोठी आर्थिक फटका बसला आहे. या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी ५३.७३ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. हा मदत निधी थेट डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू केली जाणार आहे.
ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या दरम्यान राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता. ऐन उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळीने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली होती. या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान स्वरूपात मदत करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. सरकारने मदतीसाठी ५३ कोटी ७३ लक्ष ७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे नागपूर, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांतील हजारो बाधित शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. राज्य सरकारतर्फे दिली जाणारी मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
जवळपास ५० हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान
राज्यातील एकूण ४९,५११.७२ हेक्टरवरील शेतपिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. याचा फटका एकूण ६६,३१२ शेतकऱ्यांना बसला आहे. विभागवार नुकसानाची आकडेवारी पाहिली तर, नागपूर विभागातील गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील १,५०४ शेतकऱ्यांच्या ६६५.५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुणे विभागातील सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात ४,५६४ शेतकरी बाधित असून त्यांचे २,९६६.२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका अमरावती विभागाला बसला आहे. बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील ५१,७२९ शेतकऱ्यांच्या ४२,३८८.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यातील ८,५१५ शेतकऱ्यांच्या ३,४९१.०३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत.
२०२५ मध्ये १२८ कोटी ६५ लाखांची मदत
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे देण्यात आली होती. त्यावेळी अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या कालावधीत प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. याबाबतची माहिती ७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली होती.
सरकारतर्फे बाधित शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीत पारदर्शकता राखण्यासाठी मदतीचे वाटप पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील त्या त्या जिल्ह्यांच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांना दिलेला हा मदतीचा निधी बँकांनी त्यांच्या कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळता करून घेऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बँकांना देण्यात आले आहेत. तसेच मदतीचा हा निधी फक्त विहित प्रयोजनासाठीच वापरला जाईल, याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या हजारो बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित लेख:
