मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी | मानवगाथा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे प्रशांत इंगळे यांना मिळाले नवजीवन

हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या अकोल्यातील प्रशांत इंगळे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून मिळालेल्या मदतीमुळे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करता आली. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत प्रशांत यांना त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वत:च्या यकृताचा काही भाग दान करून त्यांनी जीवनदान दिले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून यकृत प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली गेली. ज्यामुळे प्रशांत इंगळे यांच्यासारख्या गरजुला वेळेवर उपचार मिळून नवजीवन मिळाले. लिव्हर ट्रान्सप्लांटचा मोठा खर्च पेलणे कठीण असलेल्या रुग्णांसाठी ही सरकारी योजना एक अत्यंत प्रभावी आणि दिलासादायक आधार देणारी योजना ठरत आहे.

यकृत प्रत्यारोपणासाठी २५ ते ३० लाखांचा खर्च

अकोला येथील ४७ वर्षीय प्रशांत इंगळे हे केबलचा व्यवसाय करून आपल्या वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयात शिकणारी मुलगी आणि दहावीतील मुलगा अशा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी झाल्याचे निदान झाले आणि डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, या उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येणार होता. जो इंगळे कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने यकृत प्रत्यारोपण करणे अशक्यप्राय झाले होते. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत प्रशांत यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण तरीही उपचाराच्या खर्चाचा प्रश्न कायम होता.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून तातडीने दखल

याबाबत इंगळे कुटुंबियांनी स्थानिक आमदारांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली. आमदारांनी त्यांना मुंबईत येऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची मार्गदर्शन घेण्याचे सुचवले. त्यानुसार वैद्यकीय सहाय्यता कक्षातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत त्याचा पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांना २ लाख रुपयांची मदत मंजूर झाली. याशिवाय, मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून तब्बल १९ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. अशा प्रकारे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारला गेल्यामुळे अत्यंत खर्चिक असलेले हे यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.

सरकारच्या तत्परतेमुळे प्रशांत इंगळे यांना मिळाले नवे आयुष्य

या मिळालेल्या आर्थिक बळामुळे २५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात प्रशांत इंगळे यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाल्याने १३ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून सुखरूप घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते वेगाने बरे होत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे प्रशांत इंगळे यांना नवे आयुष्य मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्यामुळे प्रशांत इंगळे यांना जीवनदान मिळाले आहे. पैशांअभावी कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार थांबायला नको या उद्देशाने हा कक्ष सातत्याने कार्यरत आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *