महाराष्ट्रातील सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी (मुख्यमंत्री मदत निधी) हा कक्ष खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वाखाली या कक्षाच्या माध्यमातून हजारो गरीब कुटुंबांना वैद्यकीय आणीबाणीत तत्पर आर्थिक मदत मिळवून दिली जात आहे. याचा नुकताच एक प्रत्यय सातारा फलटणमध्ये दिसून आला. एका १०० वर्षीय आजींना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २४ तासात मदत मिळवून देऊन त्यांच्यावरील आवश्यक शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यातून त्यांचा जीव वाचला.

कोणत्याही कुटुंबात अचानक उद्भवणारे गंभीर आजारपण किंवा अपघात हे शारीरिकच नाही, तर मोठे आर्थिक संकटे घेऊन येतात. अशा अत्यंत कठीण प्रसंगात सरकारी प्रक्रियेतील लालफितीचा कारभार बाजूला सारून, गरजू रुग्णांपर्यंत अवघ्या काही तासांत आर्थिक मदत पोहोचवण्याचा एक नवा आदर्श मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने निर्माण केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही योजना फक्त कागदोपत्री न ठेवता, ती अत्यंत पारदर्शक आणि वेगवान ठेवली. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हक्काचा कक्ष म्हणून याकडे पाहिले जात आहे. याचे ताजे उदाहरण सातारा जिल्ह्यात पाहायला मिळाले. फलटणमधील एका १०० वर्षीय आजी सरूबाई मुंजवार यांचा प्रवासादरम्यान रस्ता ओलांडत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात सरूबाई गंभीर जखमी झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले. पण, उपचारासाठी लागणारा सव्वा लाखांचा खर्च या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. त्यांच्या नातेवाईकांनी २५ जून रोजी मदतीसाठी अर्ज केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वैद्यकीय कक्षाने या अर्जाची गांभीर्याने दखल घेत, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अवघ्या २४ तासांच्या आत त्यांना आर्थिक सहाय्य मंजूर केले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या या अत्यंत वेगवान निर्णयामुळे शतकोत्तर आयुष्य पाहिलेल्या एका आजींवर वेळेत शस्त्रक्रिया होऊ शकली आणि त्यांचा जीव वाचला. एका दिवसात मिळालेली ही मदत प्रशासनाच्या संवेदनशीलतेची साक्ष देते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, राज्यातील कोणताही नागरिक पैशांअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी हा वैद्यकीय कक्ष अहोरात्र कार्यरत आहे. जर रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि अर्ज परिपूर्ण असतील, तर २४ तासांच्या आत निधी मंजूर करून थेट रुग्णालयाला वर्ग केला जातो, ज्यामुळे उपचारांमध्ये कोणताही खंड पडत नाही. सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांना या सुविधेचा लाभ सहज घेता यावा यासाठी १८०० १२३ २२११ हा टोलमुक्त क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही तत्पर वैद्यकीय सेवा आज राज्यातील लाखो गरिबांसाठी, दुर्बल घटकांसाठी आणि संकटग्रस्त कुटुंबांसाठी एक हक्काचा आधारवड ठरली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा सरकारवरील आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सहाय्यता कक्ष
सरकारने राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मुंबईत हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सुरू केला आहे. या कक्षात स्थानिक पातळीवरच अर्जांची छाननी, कागदपत्रे जमा करणे आणि रुग्णालयांची माहिती देणे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबियांचा आणि नातेवाईकांचा वेळ वाचत आहे आणि रुग्णांनाही लगेच उपचार मिळण्यास मदत होत आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. ज्याद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना महागड्या व दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी थेट आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
अर्जदाराची पात्रता – अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही सरकारी योजनेचा, जसे की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत नसलेले रुग्ण या मदतीसाठी पात्र ठरतात.
उपचार होणारे आजार – या कक्षातून कॅन्सर, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, किडनी-लिव्हर-हृदय प्रत्यारोपण आणि गंभीर अपघातांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रुग्णालयाचा खर्चाचा अधिकृत अंदाज आणि मेडिकल रिपोर्ट.
