मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे. हा कक्ष राज्यातील गरजू व होतकरू तसेच सर्व प्रकारच्या रुग्णांना आर्थिक मदत करतो. या आर्थिक मदतीसाठी अर्ज कसा करायचा? कुठे आणि कोणाला करायचा? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकारचा ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ हा राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत पुरवणारा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. वैद्यकीय उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे कोणत्याही कुटुंबावर आर्थिक संकट ओढवू नये, यासाठी हा कक्ष मुख्यमंत्री कार्यालयाच्या देखरेखीखाली कार्यरत आहे. भरमसाठ वैद्यकीय खर्च न झेपणाऱ्या कुटुंबांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आर्थिक मदत मिळते. त्यासाठी काही गोष्टींची प्रक्रिया पार पाडावी लागते. पूर्वी यासाठी रुग्णाच्या कुटुंबियांना / नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयात येऊन पाठपुरावा करावा लागत होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे सहाय्यता निधीसाठी संबंधितांना मंत्रालयात येण्याची गरज नाही.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कसा काम करतो?

  • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष थेट मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्रालयातील विशेष टीमद्वारे संचालित केला जातो. 
  • हा कक्ष इतर सरकारी योजना जसे की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये किंवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यामधून ज्या रुग्णांना पूर्ण मदत मिळत नाही किंवा ते पात्र ठरत नाहीत, अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून दिले जाते. 
  • पूर्वी या कक्षाचे कामकाज फक्त मंत्रालयातून चालत होते. पण आता याचे कामकाज मुंबईपुरते मर्यादित न राहता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांच्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यास मदत होत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी किती मिळतो?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आजारांच्या स्वरूपानुसार आणि उपचाराच्या खर्चानुसार साधारणपणे २५ हजारांपासून ते काही गंभीर आजारांसाठी २ लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. कर्करोग (कॅन्सर), अवयव प्रत्यारोपण (किडनी, यकृत, हृदय), व इतर गंभीर आजारांसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत थेट मदत दिली जाते. उपचाराचा खर्च १० लाखापेक्षा जास्त असल्यास आणि कुटुंब अत्यंत गरीब असल्यास क्राउडफउंडिंग द्वारे सरकार साहाय्य उपलब्ध करते.

कोणत्या २० गंभीर आजारांसाठी मदत दिली जाते?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षांतर्गत प्रामुख्याने खर्चाचे मोठे प्रमाण असणाऱ्या २० गंभीर आजार व वैद्यकीय उपचारांसाठी मदत पुरवली जाते. त्यात खालील आजारांचा समावेश आहे.

१. कर्करोग (कॅन्सर – शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)

२. हृदयविकार / हृदय शस्त्रक्रिया (ओपन हार्ट सर्जरी, बायपास, व्हॉल्व रिप्लेसमेंट)

३. मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट)

४. यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट)

५. हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट)

६. बोन मॅरो ट्रान्सप्लांट

७. मेंदूचे आजार / न्युरो सर्जरी (न्युरोलॉजिकल डिसऑर्डर / सर्जरी)

८. डायलिसिस

९. गंभीर अपघात व आयसीयू 

१०. नवजात बालकांचे आजार व शस्त्रक्रिया

११. कॉक्लियर इम्प्लांट (लहान मुलांचे ऐकण्याचे शस्त्रक्रिया)

१२. सेरेब्रल पाल्सी

१३. हिप व नी रिप्लेसमेंट

१४. सीव्हीए (मेंदूतील रक्तवाहिन्यांसंदर्भात)

१५. गंभीर भाजलेले रुग्ण

१६. फुफ्फुस प्रत्यारोपण

१७. थॅलेसेमिया / हिमोफिलियाचे उपचार

१८. पाठीच्या कण्याचे आजार

१९. जन्मजात व्यंग किंवा विकृतीवरील शस्त्रक्रिया

२०. इतर जीवनरक्षक आपत्कालीन उपचारात्मक शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळण्याचे निकष काय?

  • रुग्ण महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य.
  • रुग्णाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपर्यंत (तहसीलदार दाखल्यानुसार) असणे आवश्यक.
  • रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, ते हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक.
  • रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे अर्ज करणे आवश्यक. डिस्चार्ज झाल्यानंतर केलेला अर्ज ग्राह्य धरला जात नाही.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज भरताना खालील सर्व कागदपत्रांची आवश्यकता असते;

  • डॉक्टर व रुग्णालयाचा सही-शिक्का असलेला विहित नमुन्यातील अर्ज
  • हॉस्पिटलने उपचारासाठी दिलेले मूळ कोटेशन. खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक/ सिव्हिल सर्जन यांनी प्रमाणित केलेले कोटेशन
  • तहसीलदार कार्यालयाने दिलेला किंवा चालू आर्थिक वर्षातील १.६० लाखांपेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला 
  • रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्य)
  • आजाराशी संबंधित पॅथॉलॉजी / एक्स-रे /एमआरआय व इतर वैद्यकीय रिपोर्ट
  • अपघाताची केस असल्यास पोलीस एफआयआर किंवा एमएलसीची प्रत. तसेच अवयव प्रत्यारोपण असल्यास झेडटीसीसी नोंदणी पावती व मान्यता प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया

१. रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असतानाच हॉस्पिटलकडून कोटेशन घेणे.

२. हॉस्पिटलमधील सोशल सर्व्हिस डिपार्टमेंट (एमएसडब्ल्यू सेल)कडून उपचाराच्या खर्चाचे अंदाजपत्रक आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा फॉर्म मिळवणे.

३. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड जोड आणि प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांकडून (सिव्हिल सर्जन) कोटेशन प्रमाणित करून घ्या.

४. अर्ज ऑनलाईन पद्धतीने cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर किंवा ‘CM Relief Fund’ मोबाईल ॲपद्वारे भरता येईल. सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा.

५. ऑफलाईन अर्ज सर्व कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून किंवा मंत्रालयातून भरू शकता.

६. कक्षातील वैद्यकीय अधिकारी कागदपत्रांची शहानिशा करून, अर्ज पात्र ठरल्यास थेट मंजूर केला जातो.

७. मंजूर झालेली अर्थसहाय्याची रक्कम हॉस्पिटलच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली जाते.

महाराष्ट्र राज्याबाहेरील रुग्ण आणि हॉस्पिटलसाठी हा निधी वापरता येत नाही. ही प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल व पेपरलेस झाल्यामुळे मध्यस्थांची गरज लागत नाही. अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता किंवा अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ किंवा ९३२११०३१०३ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *