वाशिम | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

वाशिममधून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ अभियानाला बळ; हजारो रुग्णांच्या जीवनात नवा प्रकाश

वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने वाशिम जिल्हा प्रशासन आणि जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशन यांच्यात २०२६ ते २०३२ या कालावधीकरीता एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशिम जिल्ह्याला पूर्णपणे मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला.

जिल्हा रुग्णालयाचे ‘ओटी’ पाचही दिवस सुरू राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत वाशिम जिल्हा प्रशासन आणि जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशन यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जाणार आहे. वाशिम जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियांची क्षमता वाढवण्यासाठी तेथील ऑपरेशन थिएटर (ओटी) आता आठवड्यातून तीन ऐवजी पाच दिवस सुरू ठेवले जाणार आहे. याशिवाय कारंजा-लाड येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज नेत्र-चिकित्सा विभाग तसेच ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियांची क्षमता आणि गती वाढवण्यासाठी अतिरिक्त तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका आणि ऑप्टोमेट्री कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

ब्लॉकस्तरीय आरोग्य संस्था सक्षम करणार

२०२७-२८ या आर्थिक वर्षात जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाने मिळून एकूण ४,४०० डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. मागील आर्थिक वर्षात वाशिममध्ये १,८१८ डोळ्यांची ऑपरेशन्स झाली होती. यावेळी वाशिम जिल्हा प्रशासनाने मागील वर्षीच्या तुलनेत अडीच हजारापेक्षा अधिकचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी प्रशासनाने फक्त मोठ्या रुग्णालयांवर भर न देता प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमधील ब्लॉकस्तरीय व्हिजन सेंटर सक्षम केली जाणार आहेत. जेणेकरून गावागावातील रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी मुख्य रुग्णालयांमध्ये पाठवण्याची यंत्रणा तयार होईल.

काय आहे ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ अभियान!

‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची एक महत्त्वपूर्ण मोहीम आहे, ज्याचा मुख्य उद्देश राज्यातील विशेषतः वयोवृद्ध आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वापासून मुक्त करणे आणि मोफत उपचार पुरवणे हा आहे. राज्यातील प्रलंबित मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी सरकारने पुढील तीन वर्षांत संपूर्ण राज्याला मोतीबिंदूमुक्त करण्याचे सुधारित लक्ष्य ठेवले आहे. दरवर्षी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत टप्प्याटप्प्याने राज्यभरात शिबिरे आयोजित केली जातात. आकांक्षित जिल्ह्यांमध्ये विशेष निधी आणि पायाभूत सुविधा पुरवून शस्त्रक्रियांची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. नागरिक आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत नेत्रतपासणी करू शकतात. मोतीबिंदूचे निदान झाल्यास संबंधित रुग्णाची बीपी, शुगर व इतर आवश्यक चाचण्या करून सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाते. याविषयीची अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी नागरिक १०४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी टप्प्याटप्प्याने मोठी गुंतवणूक

जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशन सीएसआर अंतर्गत २०२६ ते २०३२ या कालावधीत वाशिम जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या वर्षासाठी फाउंडेशनतर्फे १.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या निधीतून आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विशेष प्रशिक्षित मनुष्यबळ, आपत्कालीन सुविधा आणि उपचारांवर डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवणारी प्रणाली विकसित केली जाणार आहे. एका खाजगी संस्थेच्या मदतीने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ घडविण्याच्या स्वप्नाला वाशिम जिल्ह्यातून मोठी ताकद मिळत आहे. या खाजगी संस्थेने स्वत:ची समांतर व्यवस्था उभी न करता, सरकारी यंत्रणेलाच अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. जो खूपच स्तुत्य उपक्रम आहे. हे पीपीपी मॉडेल भविष्यात संपूर्ण राज्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण ठरेल. या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो गरजू रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट येण्यास मदत होणार आहे.

संबंधित लेख:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *